मावळ येथील किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट आखल्याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले
मावळ तालुक्यातील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची नगरपरिषदेच्या आवारात गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मावळातील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशातच आता किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट आखण्याऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी चार पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शरद साळवी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात हत्या, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर सांडभोर याच्यावरही आठ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
किशोर आवारे यांचा १२ मे रोजी तळेगाव नगरपरिषदेसमोर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या हत्या प्रकरणात माजी नगराध्यक्षाचा मुलगा गौरव खळदे याच्यासह सात जणांना अटकही करण्यात आली आहे. मात्र आज किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांना कट आखल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोण आहेत पकडलेले गुन्हेगार?
किशोर आवारे हत्येचा बदला घेण्यासाठी पकडण्यात आलेला प्रमोद सांडभोर हा तळेगाव येथे जमीन खरेदी विक्रीचे काम करतो, तर शरद साळवी हा दोन महिन्यांपूर्वीच हत्येच्या गुन्ह्यात बाहेर आलेला आहे. त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही आवारे हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या दोघांची चौकशी सुरू असून लवकरच आणखी माहिती समोर येणार आहे. प्रमोद सांडभोर हा किशोर आवारे यांच्या जवळचा असल्याची माहिती देखील समोर येत असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.