पिंपरी:: नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू( Pimpri) झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तारखांचे आरक्षण आणि प्रस्तावित भाडेवाढीचा फेरविचार करून त्यास तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा पिंपरी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ प्रस्तावित केली असून तारखांचे वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जुलै 2023 पासून याची अंमलबजावणी सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.
नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नाटके, बालनाट्य, गाण्यांचे कार्यक्रम, एकांकिका आदींसाठी अपेक्षित तारखा मिळणे अवघड होऊन बसेल. यात आयोजकांचे नुकसान होण्याबरोबरच रसिक प्रेक्षकांचाही हिरमोड होईल.
ऑनलाईन पध्दतीने तारखांचे वाटप करू नये. नाटकात काम करणाऱ्या सर्व कलाकारांच्या तारखा जुळून आल्यानंतर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगांच्या तारखा निश्चित केल्या जातात. इतरही अनेक गोष्टी त्या दिवशी जमवून आणाव्या लागतात. अशा वेळी नाट्यगृहाची तारीख न मिळाल्यास तथा मिळालेली तारीख हातातून गेल्यास अनेकांची गैरसोय होते आणि तो दिवस व्यर्थ ठरल्याने आर्थिक नुकसानही होण्याची भीती आहे.तसेच कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल.
नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ती वाढ अवाजवी असू नये. नाट्यव्यावसायिकांना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना परवडणारे दर असावेत. नाट्प्रयोग होण्यापूर्वी तीन महिने अगोदर भाडेदर, अनामत रक्कम आदी रक्कम भरण्याचे प्रस्तावित असून ते शक्य होणार नाही. तसे होणे कठीण आहे. या निर्णयाचा आपण फेरविचार करावा. नाट्यगृहांच्या तारखा आरक्षित करताना शनिवार आणि रविवारी
येणाऱ्या तारखा प्राधान्याने नाटकांसाठी राखून ठेवाव्यात. (त्याचे कारण या दोन दिवशीच नाटकांना समाधानकारक प्रेक्षक वर्ग लाभतो.) दिलेल्या तारखा काहीही कारण न देता काढून घेतल्या जातात. या प्रकारांना आळा बसावा. नाट्यगृहांमध्ये नियुक्त केले जाणारे अधिकारी जाणकार असावेत. किमान या क्षेत्राविषयी त्यांना पुरेशी माहिती( Pimpri) असावी.
पिंपरी चिंचवड शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण होत असतानाच या सांस्कृतिक चळवळीच्या खोड आणण्याचे काम महापालिका करताना दिसून येत आहे,
सांस्कृतिक चळवळीला योग्य तो न्याय मिळावा म्हणून भाडे वाढवून ऑनलाईन बुकिंग यासारख्या निर्णयास स्थानिक व इतर विभागातील कलाकारांकडून कडकडून विरोध होत आहे सध्याची भाडे वाढ ही न परवडणारी भाडेवाढ आहे त्यामुळे तात्काळ नगर विकास विभागाला सूचना देऊन भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अमित गोरखे यांनी केली आहे.
त्यांनी आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.