Wednesday, April 24, 2024
Homeताजी बातमीसरकारी घोळ! राज्यात ‘ऑनलाइन’ शिकाऊ परवान्याची ‘असून अडचण नसून खोळंबा’

सरकारी घोळ! राज्यात ‘ऑनलाइन’ शिकाऊ परवान्याची ‘असून अडचण नसून खोळंबा’

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ऑनलाइन दिला जातो. प्रत्यक्षात परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परीक्षा द्यावी लागत असल्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ऑनलाइन दिला जातो. प्रत्यक्षात परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परीक्षा द्यावी लागत असल्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. याचबरोबर परीक्षेसाठी अशा उमेदवारांकडून दोनवेळा शुल्क घेतले जात आहे. यामुळे शिकाऊ परवाना देण्याची सुविधा केवळ नावालाच ऑनलाइन सुरू असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आरटीओतील ७६ पैकी ५६ सेवा ऑनलाइन दिल्या जात आहेत. त्यात शिकाऊ वाहन परवान्याचाही समावेश आहे. एखादा व्यक्ती त्याच्या घरी बसून या परवान्यासाठी अर्ज करू शकतो. त्याची परीक्षाही ऑनलाइन घेतली जाते. ही १५ गुणांची बहुपर्यायी परीक्षा असते. परीक्षेत ९ गुण मिळवणारा उमेदवार उत्तीर्ण होतो. अशा उमेदवारांना लगेचच ऑनलाइन शिकाऊ वाहन परवानाही मिळतो.

सध्या राज्यभरातील आरटीओमध्ये याउलट चित्र दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील ५३ आरटीओंमध्ये ऑनलाइन शिकाऊ परवाना देण्याचा गोंधळ सुरू आहे. ऑनलाइन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत उत्तीर्ण होऊन आरटीओमध्ये पुन्हा परीक्षेसाठी बोलावले जात आहे. ऑनलाइन परीक्षा देताना आजूबाजूचा आवाज आल्यास अथवा उमेदवाराची हालचाल झाल्यास त्याला आरटीओमध्ये बोलावले जात आहे. विशेष म्हणजे, या उमेदवारांनी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे संदेश येत आहेत. त्याचवेळी आरटीओमध्ये पुन्हा परीक्षेसाठी हजर राहण्याचेही संदेश येत आहेत. अशा उमेदवारांचे प्रमाण तब्बल ६० टक्के आहे.

आरटीओमध्ये हे उमेदवार गेल्यानंतर त्यांचे अर्ज सापडत नाहीत. त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगितले जाते. यासाठी त्यांच्याकडून पुन्हा एकदा शुल्क घेतले जाते. एका प्रकारच्या वाहनासाठी २०१ रुपये आणि दुहेरी प्रकारच्या वाहनांसाठी ३०२ रुपये शुल्क आहे. हे शुल्क उमेदवारांना पुन्हा भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यानंतर त्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा सोपस्कार पार पाडावा लागत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

शिकाऊ परवाना ऑनलाइन न मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत दोन महिन्यांपूर्वी परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी ऑनलाइन परवाना प्रक्रियेतील अडचणी मांडण्यात आल्या होत्या. त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात अडचणी कायम आहेत.- राजू घाटोळे, प्रदेशाध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन

शिकाऊ वाहन परवान्यासाठी उमेदवार परीक्षा देताना हालला, आजूबाजूला काही आवाज आला तर त्याला अनुत्तीर्ण दाखवून आरटीओमध्ये परीक्षेसाठी बोलावले जाते. याचबरोबर आधारकार्डची माहिती न जुळल्यासही ऑनलाइन परवाना देण्यास अडचणी येतात. याबाबत तक्रारी आल्यास ऑनलाइन यंत्रणेत आणखी सुधारणा करता येतील. – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments