चार दशकांपासून जवानांची सेवा करणाऱ्या पुण्यातील परिचारिका बहिणींना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
गेल्या चार दशकांपासून लष्करी परिचर्या सेवेत राहून देशभरातील विविध ठिकाणी लष्करी जवानांची सेवा करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मानाचा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. मेजर जनरल स्मिता देवराणी व ब्रिगेडियर अमिता देवराणी अशी या दोन भगिनींची नावे असून स्मिता यांना २०२२ साठीचा व अमिता यांना २०२३ साठीचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
मूळच्या उत्तराखंडच्या असलेल्या देवराणी भगिनींनी लष्कराच्या विविध रूग्णालयांमध्ये आपली सेवा दिली आहे. स्मिता देवराणी सध्या लष्करी परिचर्या सेवेच्या (एमएनएस) अतिरिक्त महासंचालक (एडीजी) या पदावर कार्यरत आहेत. तर अमिता देवराणी या लष्करी परिचर्या सेवेत दक्षिण मुख्यालयात ब्रिगेडियर या पदावर कार्यरत आहेत. मेजर जनरल स्मिता या १९८३ मध्ये लष्करी परिचर्या सेवेत दाखल झाल्या. त्या पाठोपाठ तीन वर्षांनी ब्रिगेडियर अमिता याही याच सेवेत दाखल झाल्या. लष्करामध्ये दोन सख्खे भाऊ, भगिनी एकाच वेळी आपली सेवा बजावत असतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. देवराणी भगिनींनीही आपल्या सेवेचे अनोखे उदाहरण देशातील महिलांसमोर प्रस्थापित केले आहे.
दोन्ही भगिनींनी आतापर्यंत प्राचार्य, नर्सिंग महाविद्यालय, सशस्र दल वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, लष्करी रुग्णालय, संशोधन आणि संदर्भ; तसेच उपप्राचार्य, नर्सिंग महाविद्यालय, भारतीय नौदल रुग्णालय जहाज (आयएनएचएस) अश्विनी अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.