आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर आणि भाजपावर घणाघाती टीका
मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात खोके सरकारचा जो भ्रष्टाचार सुरु आहे त्याविरोधात आपण वेळोवेळी आम्ही आवाज उठवला आहे. रस्त्यांचा घोटाळा, खडीचा घोटाळा, सॅनेटरी पॅड व्हेंडिंग मशीनचा घोटाळा असे अनेक घोटाळे मुंबई महापालिकेत होत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून ते होत असतील. असे खूप घोटाळे राज्यभरात होत आहेत. मुंबईतले जे घोटाळे समोर आले आहेत त्याविरोधात आम्ही १ जुलैला मोर्चा काढणार आहोत असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुंबईचा पैसा दिल्लीश्वरांच्या सांगण्यावरून लुटला जातोय
मुंबईचा पैसा दिल्लीश्वरांच्या सांगण्यावरुन लुटला जातो आहे. कुठे जातो आहे कुणालाच माहित नाही किंवा सगळ्यांना ठाऊक असेल. पण हे सगळं करताना आम्ही संपूर्ण मुंबईला १ जुलैच्या मोर्चासाठी सहभागी करण्याचं आवाहन करतो आहोत. मुंबईतले ५० रस्ते पूर्ण झालेले नाही. मुंबईत घाणेरडे लाईट्स लावले आहेत. यातले घोटाळे आम्ही बाहेर काढणार आहोत. भाजपाच्या काही आमदारांनीही या घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला होता.
पार्टी विथ डिफरन्स असं भाजपा कसं काय सांगणार?
सूरज चव्हाणच्या घरी मी गेलो होतो. मात्र जे खरे शिवसैनिक आहेत ते असल्या कारवायांना ते घाबरत नाहीत. त्यांच्या परिवाराने आम्हाला सांगितलं की घाबरायचं नाही. आम्ही त्यामुळे आता पुढे चाललो आहोत. ज्या मंत्र्यांची हकालपट्टी व्हायला हवी ती होत नाही. कर्नाटकात आपण ४० टक्के सरकार समजत होतो इथे १०० टक्के खोके सरकार झालं आहे अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.
भाजपा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणत होती. मग तीच भाजपा या मिंधे आणि चिंधी सरकारबरोबर कशी? देशात हे आता पार्टी विथ डिफरन्स आहोत हे या भ्रष्ट लोकांसह बसून कसं सांगणार? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
मागच्या वर्षभरात आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या पैसे घेऊन केल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अधिकारी पैसे मागत आहेत. कृषी क्षेत्र कोलमडलं आहे, वेदांता फॉक्स कॉन अशी भयंकर परिस्थिती कधीही महाराष्ट्रात आली नव्हती.
बाळासाहेब ठाकरे हेच आमचं सर्वात मोठं सुरक्षा कवच
ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केली या बातमीचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इन्कार केला आहे. मात्र तुम्ही मातोश्रीच्या बाहेर येऊन पाहिलंत तर तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. तो ठाकरे कुटुंबाचा विषय असल्याने मी त्यावर बोललो नाही. मात्र इतकंच सांगेन की आमचं सुरक्षा कवच हे बाळासाहेब ठाकरे आणि भारतातली जनता आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या आणि खोके वृत्तीच्या विरोधात लढत आहोत, आम्ही लढत राहणार असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
राजकीय हेतूने आणि चिंधी मनाने कारवाया होत आहेत. याची दखल संपूर्ण देशच नाही तर ३३ देश घेत आहेत. जी गद्दारी त्यांनी केली जी त्या गद्दारीची दखलही ३३ देशांनी घेतली आहे. मुंबई महापालिका ही हुकूमशाही राजवटीत चालवली जाते आहे. याच मुंबई महापालिकेने जे गद्दार, घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत, त्यांच्याच फोटोवर हातोडा मारला आणि बुलडोझर चालवला आहे. हे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सहन करणार आहेत का? हे सगळं सच्चा शिवसैनिक लक्षात ठेवणार आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.