एकनाथ शिंदेंनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.
शिवसेनेचा सोमवारी ( १९ जून ) ५७ वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन साजरे करण्यात आले. शिवसेनेकडून ( शिंदे गट ) नेस्को सेंटर येथे वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. “एक नोटीस आली, तेव्हा XXX पातळ झाली होती. नंतर पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी गेला,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
“भाषणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना किती शिव्या दिल्या. अब्दाली, हिटलर, अफजल खान म्हटलं. अरे ते कुठं, तुम्ही कुठं… सर्व राज्याने पाहिलं आहे, जेव्हा एक नोटीस आली, तेव्हा XXX पातळ झाली होती. नंतर मोदींना भेटण्यासाठी गेला. शिष्टमंडळ बाहेर ठेवलं आणि शिष्टाई आतमध्ये गेली. आम्हाला सर्व माहिती आहे,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
“अरे मणिपूर काय मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन…”
“ते जोपर्यंत बघत नाहीत, तोपर्यंत ठिक आहे. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. त्यामुळे आपल्या मर्यादेत आणि कुवतीत राहा. काल भाषणात म्हणाले, मणिपूरला जाण्याची हिंमत दाखवा. अरे मणिपूर काय मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून टाकला. तुम्ही वर्षावरून मंत्रालयात जाऊन दाखवलं नाही,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“…म्हणून मिंधे दिल्लीला जातात”
नोटीशीवरून पंतप्रधान मोदींना भेटल्याच्या दाव्यावर आज ( २० जून ) शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंना विचारलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. “रोज नोटीसा येत असल्याने मिंधे दिल्लीला जातात,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.