आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करत मुंबईत एवढा निर्लज्जपणा आणि नाकर्तेपणा कधीच पाहिला नाही, असं म्हणत टीका केली. आता त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं.“…
मुंबईत पहिल्याचा पावसानंतर पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाणी साचलं हे काय सांगता, पाऊस आला याचं स्वागत करा असं वक्तव्य केलं. यानंतर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करत मुंबईत एवढा निर्लज्जपणा आणि नाकर्तेपणा कधीच पाहिला नाही, असं म्हणत टीका केली. आता त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते रविवारी (२५ जून) माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा पाऊस पडू द्या. पावसाचं स्वागत करा, आम्हाला बदनाम करायला अजून वेळ आहे. आम्ही सांगितलं आहे की, जिकडे नाले भरतील, जिकडे पाणी तुंबेल त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू. जिकडे पाणी तुंबणार नाही तिकडे आम्ही सत्कार करू.”
“…तर मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होणार नाही”
दरम्यान, रविवारी ठाण्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शनिवारी रात्री मुंबईत एका तासात ७० मिलिमीटर पाऊस पडला. मात्र, असं असलं, तरी मिलन सब-वेप्रमाणेच मुंबईत इतर ठिकाणीही यंत्रणा कार्यान्वित केल्यास मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होणार नाही.”
“पाणी पंपिंगनं बाजूच्या नाल्यात सोडलं जातंय”
“मिलन सब-वेमध्ये लावलेली यंत्रणा काम करतेय का? हे पाहायला मी आज आलो. मिलन सब-वेमधली वाहतूक चालू आहे. सब-वेमध्ये पाणी साचल्यानंतर ते पाणी पंपिंगनं बाजूच्या नाल्यात सोडलं जातंय. त्यानंतर ते पाणी तिथून थेट मोठ्या टँकमध्ये सोडलं जातंय. अशी यंत्रणा इथे लावण्यात आली आहे. फ्लडगेटही लावले आहेत. त्यामुळे भरती येईल तेव्हा फ्लडगेटमुळे पाणी आत येणार नाही,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली
“मिलन सब-वेमधली वाहतूक व्यवस्थित चालू”
“ही व्यवस्था नीट काम करते आहे. त्यामुळेच मिलन सब-वेमधली वाहतूक व्यवस्थित चालू आहे. यासंदर्भातल्या सूचना मी आयुक्तांना दिल्या आहेत. पाणी साचण्याची जेवढी ठिकाणं आहेत, त्या सर्व ठिकाणी अशीच प्रणाली राबवण्याचे आदेश मी दिले आहेत. असं केलं, तर पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाही. अशी यंत्रणा अंधेरी आणि इतर ठिकाणीही आपण लावतोय”, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.