शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी पाटण्याला गेल्यावर फडणवीसांनी हे कुटुंब वाचवायला जात आहेत अशी टीका केली. त्यावर उद्धव ठाकरेंनी आक्रमक होत मला तुमच्या कुटुंबावर बोलावं लागलं तर तुम्हाला शवासन करावं लागेल, असा इशारा दिला. ते शनिवारी (२४ जून) मुंबईत शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी शुक्रवारी (२३ जून) शिवसैनिकांना सांगून पाटण्याला गेलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनात आपली किती भिती बसली आहे. मी पाटण्याला गेलो, तर हे लगेच म्हणतात हे कुटुंब वाचवायला गेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये.”
“फडणवीसांच्या कुटुंबातील व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत”
“कुटुंब फडणवीसांनाही आहे. त्यांच्या कुटुंबातील व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही अद्याप त्यावर बोललेलो नाही. जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल. त्यांना वेगळी कोणतीही आसनं झेपणार नाहीत. केवळ शवासन, फक्त पडून रहावं लागेल. योगा डे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
“तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कुणी घेत असेल, तर…”
“फडणवीसांनी माझ्या कुटुंबावर बोलू नये. मी माझ्या कुटुंबाबाबत संवेदनशील आहे आणि हे माझं कुटुंब आहे. सुरज माझ्या कुटुंबातील आहे आणि हे सर्व शिवसैनिक, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कुणी घेत असेल, तर तुमचं तुम्हाला माहिती आहे. मात्र, मी माझं कुटुंब जपणार आणि ते माझ्याबरोबर आहे,” असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.
“सर्वोच्च मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री नाही हीच पोटदुखी”
यावेळी उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा आरोप आणि शिवसैनिक सुरज चव्हाणवरील ईडी कारवाई यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार कोविड काळातील भ्रष्टाचार काढत आहेत. त्यांनी तो जरूर काढावा. करोना काळात देशभरात जेवढे सर्व्हे झाले त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. ही यांची पोटदुखी आहे. भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्याच्या यादीत आलेलं नव्हतं. त्यामुळेच त्यांची पोटदुखी आहे.”
“भाजपाला घोड्याचंच औषध द्यावं लागेल”
“भाजपाच्या पोटदुखीसाठी त्यांना निवडणुकीत जमालगोटा द्यायचाच आहे. कारण त्यांना घोड्याचंच औषध द्यावं लागेल. त्यांचा कोटा एकदाच साफ करावा लागेल,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.
“करोना काळातील घोटाळा म्हणत बोभाटा सुरू आहे. त्या सुरजवर धाड टाकली. सुरज एक साधा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाला धक्का, असं म्हणतात,” असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.