दर्शना पवार हिच्या खून प्रकरणी पुणे पोलिसांनी राहुल हांडोरे याला अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दर्शनाच्या वडिलांनी राज्य सरकारकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, अशी मागणी केली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून मित्र सुधीर उर्फ राहुल दत्तात्रय हांडोरे यानेच केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी राहुलला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशन येथून बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्यापूर्वी राहुल रेल्वेनं वेगवेगळ्या राज्यातून प्रवास केला होता. राहुल हांडोरे यानं पोलिसांपुढं लग्नाला नकार दिल्याने दर्शनाचा खून केल्याची कबुली दिली आहे. रविवारी (१८ जून) राजगड किल्ल्याच्या पायथ्याला दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती. दर्शनाचे वडील दत्ता पवार यांनी राज्य सरकारनं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी केली आहे. मुलीनं कष्टानं अभ्यास करुन यश मिळवलं होतं, ती अधिकारी होणार याचा आनंद होता पण तो अल्पायुषी ठरल्याचं ते म्हणाले.
प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, दर्शनाच्या वडिलांची मागणी
दर्शना पवार हिचे दत्ता पवार हे वडील एका साखर कारखान्यात चालक म्हणून काम करतात. माझ्या मुलीनं अनेक अडचणींचा सामना करत एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं होतं. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
माझ्या मुलीनं स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास केला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्यानंत अधिकारी होणार हे तिनं सांगितलं त्यावेळी अभिमान वाटला होता. पण, तो आनंद अल्पायुषी ठरला, असं दत्तात्रय पवार टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं. आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
दर्शना पवारचा १२ जूनला खून
दर्शना पवार आणि राहुल हांडोरे १२ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता राजगड किल्ल्यावर गेले होते. सकाळी पावणेअकरा वाजता राहुल गडावरून एकटाच खाली आल्याचे पायथ्याशी असलेल्या हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून स्पष्ट झालं होतं. त्यानंतर राहुल याचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी राहुलला बुधवारी रात्री मुंबईतील अंधेरी स्टेशन येथून ताब्यात घेतले. दर्शनाने लग्नास नकार दिल्याने तिचा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.