Thursday, May 23, 2024
Homeआंतरराष्ट्रीयगुजरात सेमीकंडक्टरचं हब बनणार? पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात दोन मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक

गुजरात सेमीकंडक्टरचं हब बनणार? पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात दोन मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये (Gujrat) येणार हे स्पष्ट झालं आहे. सेमी कंडक्टर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्राँननं आपला प्रकल्प गुजरातमध्ये येणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून काही आरोप प्रत्यारोपही होत आहेत.

गुजरात देशात सेमीकंडक्टरचं हब बनणार का? पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात झालेल्या एका करारानं याची चर्चा सुरु झाली आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातली बलाढ्य कंपनी मायक्रॉन ही गुजरातमध्ये 22 हजार 540 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 5 हजार थेट रोजगार आणि पुढच्या काही वर्षात 15 हजार अप्रत्यक्ष रोजगार त्यातून उपलब्ध होतील, असा दावा केला जात आहे. वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ सेमीकंडक्टर निर्मितीतला हा महत्वाचा प्रकल्प गुजरातमध्ये असेल.

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं निमित्त साधूनच ही मोठी घोषणा मायक्रॉन कंपनीनं केली आहे. सेमीकंडक्टर निर्मितीत भारताला सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हे मोठं पाऊल असेल, असं केंद्राच्या वतीनं सांगितलं जात आहे. पण मायक्रॉन ही अमेरिकन कंपनी सेमीकंडक्टर भारतात बनवणार नाही, तर इथं जुळणी, चाचणी आणि पॅकेजिंग युनिट स्थापन करणार आहे.

चीन आणि तैवान हे दोन देश सेमीकंडक्टर उत्पादनात आघाडीवर आहेत. सेमीकंडक्टर उत्पादनात चीनचा वाटा 38 टक्के तर तैवानचा 27 टक्के इतका आहे. ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठीच वेगवेगळ्या पद्धतीनं सेमीकंडक्टरचं उत्पादन भारतात वाढवण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच उत्पादन नसलं तरी किमान पॅकेजिंग, असेम्बलिंगनं तरी मायक्रॉननं आपलं भारतात अस्तित्व दाखवावं यासाठी ही करार महत्वाचा आहे. पण यात कंपनीचा प्रत्यक्ष वाटा कमी आणि केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार 20 टक्के वाटा उचलणार असल्यानं प्रत्यक्षात करदात्यांचाच पैसा लागणार असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.

मोदींच्या अमेरिका दौऱ्यात गुजरातला आणखी एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. गुगलसारखी बलाढ्य कंपनी आपलं ग्लोबल फिनटेक सेंटरही गुजरातला उभारणार असल्याची घोषणा सीईओ सुंदर पिचाई यांनी केली आहे. सगळी गुंतवणूक गुजरातमध्येच कशी जातेय, याबाबत त्यामुळे महाराष्ट्रातले नेते प्रश्न उपस्थित करत आहेत.

देशाच्या पंतप्रधानांचा दौरा हा देशासाठी असतो. त्याच दृष्टीनं अमेरिका दौऱ्याचं महत्व होतं. प्रिडेटर ड्रोनबाबतचा करार हा संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं महत्वाचा होता. पण याच दौऱ्यात दोन प्रकल्प हे गुजरातकडे गेल्यानं राजकीय टीका मात्र सुरु झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments