Sunday, September 8, 2024
Homeगुन्हेगारीदर्शना पवार… पोरी चूक तुझीच आहे…!!!

दर्शना पवार… पोरी चूक तुझीच आहे…!!!

तुझी पुढची चूक म्हणजे तू चक्क एका पुरूषाला लग्नाला नकार दिलास… बाई गं, किती मोठी घोडचूक करून बसलीस तू. घोडचूक कसली, जीवघेणी चूकच म्हणायला हवी ही.

दर्शना पवार, तू हकनाक जीवानिशी गेलीस म्हणून सगळं जग हळहळतंय. तुला ओळखणाऱ्यांचं काळीज किती हललं असेल ते समजण्यासारखं आहे, पण तुला न ओळखणाऱ्याच्या हृदयालाही चटका बसल्यासारखंच झालंय गं तुझी कर्मकहाणी समजल्यावर. आपल्याच कुणावर तरी अशी वेळ आली तर व्हाव्यात तशा वेदना आहेत या.

तू इतक्या विपरित परिस्थितीमधली गर्ल नेक्स्ट डोअर झालीस ते तुझ्याच चुकांमुळे हे माहीत आहे का मुली तुला?

तुझी पहिली चूक म्हणजे तू या समाजात मुलगी म्हणून जन्माला आलीस. आपल्याकडे सन्मानाने जन्माला यायचा हक्क फक्त मुलग्यांनाच आहे, हे तुला जन्माच्या आधीच माहीत असायला हवं होतं. तरीही तुझ्या आईवडिलांनी तुला जन्माला घातलं आणि शिक्षण दिलं.

पण तू दुसरी चूक करून बसलीस. ती म्हणजे हुषार निपजलीस. लाखो विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्यासाठी आपल्या तरूणपणामधली मौल्यवान वर्षे अभ्यासात घालवत असताना तू अगदी सहज तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालीस. वनाधिकारी म्हणून रुजू होणार होतीस.

आता आर्थिक स्वार्थापोटी बाईने चूलमूल एवढंच करावं अशी अपेक्षा अगदीच कुणी करत नसलं, तरी तिने वडील, भाऊ किंवा नवऱ्याच्या नावावर नाही तर स्वत:च्या हुषारीच्या बळावर काहीतरी मिळवायचं ही चूकच आहे बाळा इथे.

त्यात तू तर अधिकारपद स्वत:च्या हुषारीच्या बळावर सरकारी अधिकाऱ्याचं पद मिळवलंस. याचा अर्थ तुला समजला तरी होता का गं ? पुढे जाऊन तू किती नरपुंगवांचे इगो दुखावणार होतीस याची तुला कल्पना तरी होती का? साधं तू केबिनमध्ये बसल्या जागेवर पाणी मागितलं असतंस तरी तुझ्या केबिनबाहेर उभ्या असलेल्या शिपायाचा पुरुषी अहं दुखावणार होता… एक बाई आपल्याला ऑर्डर सोडते म्हणजे काय या विचाराने त्याने मनातल्या मनात तुझा कितीवेळा खून केला असता तुला माहीत आहे का?

आता कर बरं हिशोब तुझ्या कारकीर्दीत तुझ्या आसपास पुरूष किती असले असते आणि त्यांच्यामधल्या किती जणांनी तुझ्यावर मनातल्या मनात असे किती वेळा वार केले असते?

तुझी पुढची चूक म्हणजे तू चक्क एका पुरूषाला लग्नाला नकार दिलास… बाई गं, किती मोठी घोडचूक करून बसलीस तू. घोडचूक कसली, जीवघेणी चूकच म्हणायला हवी ही. तो तुझ्या योग्यतेचा होता का, हा प्रश्नच येत नाही, कारण ती योग्यता तू ठरवायची होतीस. तो तुझ्या घरच्यांना मान्य होता का, हा प्रश्नच येत नाही, कारण तो तुमचा अंतर्गत प्रश्न होता. खरा प्रश्न होता आणि आहे की तो तुला हवा होता की नाही, तुला आवडत होता की नाही?

पण पोरी, इथेच खरं फसलीस.

अगदी तू दमदार सरकारी अधिकारी झालीस, स्वत:चं कर्तृत्व सिद्ध केलंस तरीही तो तुला आवडतो की नाही, हे ठरवायचा तुला अधिकारच नाही, हे असं कसं विसरलीस?

तुझा नकार म्हणजे किती भयंकर गोष्ट असते, हे तुझ्या गावीही नव्हतं की काय?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असं म्हणणाऱ्या आपल्या तथाकथित महान संस्कृतीने त्याला जन्मतच स्त्रीचा मालक असण्याचेच अधिकार दिले आहेत, हे तुला माहीत नसेल तर आश्चर्यच आहे…

त्यामुळे तिने त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान डोलवायची असते, प्रत्येक हो मध्ये हो मिळवायचा असतो, तो कसाही वागला तरी त्याच्यासाठी आपल्या जीवाच्या पायघड्या घालायच्या असतात, हे तू विसरलीस ही तुझी केवढी मोठी चूक आहे, मुली…

तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतात म्हणे. तू त्याच्याकडे साधी नजर टाकणं हीदेखील त्याच्या दृष्टीने संमतीच असते पोरी. मग बोलणं, भेटणं एकत्र काहीतरी करणं हे तर त्याच्या दृष्टीने संमतीचे किती पुढचे टप्पे गाठलेस तू. आता तर तू फक्त आणि फक्त त्याचीच, हे त्याने ठरवून टाकलं आणि मग तू त्याला नकार देण्याची हिंमत केलीस तरी कशी ?

पुरूषाला नकार म्हणजे जगण्याला नकार हे माहीत नसणं ही तुझी चूकच…

तुझा कोणत्याही गोष्टीमधला नकार त्याला चालत नाही, आवडत नाही, पेलत नाही हे तू गपगुमान स्वीकारायला हवं होतंस. तुला तो आवडतो की नाही, यापेक्षा त्याला तू आवडतेस यातच धन्यता मानायला हवी होतीस. तो एमपीएससी उत्तीर्ण झाल्यावर मगच तू उत्तीर्ण व्हायला हवं होतंस. मग त्यानेही उपकार केल्यासारखी तुला मागणी, हो, बाजारातल्या वस्तूला असते तशी मागणी घातली असती, तुमचं लग्नं झालं असतं आणि त्याला हवा तसा सुखाचा संसार झाला असता.

त्याच्या सुखाच्या कल्पनेतच आपलंही सूख आहे, हे मान्य करायचं नाकारलंस…

एवढ्या सगळ्या चुका केल्यास तू पोरी…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments