सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांचे ट्रॅकिंगचे काम प्रायोगिक तत्वावर औंध, बाणेर आणि बालेवाडी भागापासून सुरू करण्यात आले आहे.
कामचुकार कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅकिंग करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांचे ट्रॅकिंगचे काम प्रायोगिक तत्वावर औंध, बाणेर आणि बालेवाडी भागापासून सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने ही सुविधा शहराच्या सर्व भागात राबविली जाणार आहे.
महापालिकेकडील सफाई कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. दैनंदिन कामांत एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे काही प्रमाणात अडचणीचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घनकचरा विभागातील उपलब्ध मनुष्यबळाचा सुनियोजित वापर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कर्मचाऱ्यांचे ट्रॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनगटावर कामावर असताना ‘जीपीएस’ सारख्या प्रणालीचा वापर केलेला पट्टा (बॅण्ड) बांधण्यात येणार आहे. कर्मचारी नेमका कुठे काम करीत आहे किंवा तो कोठे गेला आहे, याची माहिती नियंत्रण कक्षात बसून मिळणार आहे. तसेच कचरागाड्यांच्या हालचालींवरदेखील नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा औंध, बाणेर, बालेवाडी या भागांत कार्यान्वित करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत संपूर्ण शहरात ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.