Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीअसा असेल तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पंढरपूर दौरा, भगीरथ भालके करणार...

असा असेल तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पंढरपूर दौरा, भगीरथ भालके करणार प्रवेश

तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन महाराष्ट्रात 27 जून रोजी येत आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंढरपूरमध्ये ‘अबकी बार, किसान सरकार’ असे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरमधील आषाढी वारीसाठी येणार असल्याने या राजकीय दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातून वारकरी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या अगोदर म्हणजे 27 जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. चंद्रशेखर राव यांच्या या राजकीय दौऱ्यानिमित्त पंढरपूर तालुक्यांमध्ये मोठी राजकीय चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते व विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार: 27 जून रोजी सकाळी चंद्रशेखर राव हे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतील. त्यानंतर दहा वाजता राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या सरकोली या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. यामध्ये भगीरथ भालके यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. भालके यांच्याकडे चंद्रशेखर राव हे स्नेहभोजनही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यांच्या लाठ्या, आमची पुष्पवृष्टी: या दौऱ्यात 300 चारचाकी गाड्या, 5 हेलिकॉपटरमधून चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे सर्व, आमदार, खासदार, विधानसभेचे सभापती, उपसभापती सर्वजण उपस्थित राहणार आहे. भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांवरती लाठ्या उगारल्या; परंतु आम्ही हेलिकॉप्टरमधून वाखरी येथील रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांवरती पुष्पवर्षा करणार असल्याचेही कदम यांनी बोलताना सांगितले. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यासाठी प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments