Sunday, July 20, 2025
Homeआरोग्यविषयकउन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ?

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ?

देशाच्या अनेक भागांमध्ये कडक उन्हामुळे लोकांना त्रास होत आहे. उन्हाळ्याच्या गरम हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. ज्या महिला किंवा पुरुषांना कामासाठी, अभ्यासासाठी सतत उन्हात घराबाहेर राहावे लागते. त्यांच्यासाठी उन्हाळा हा ऋतू त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो. उन्हामुळे टॅनिंग, सनबर्न, कोरडी त्वचा, काळे ठिपके, एक्जिमा, फोड, पुरळ आणि बुरशीजन्य संसर्ग होत असतो. या ऋतूमध्ये या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. काही खबरदारी घेतल्यास कडक उन्हामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात, असे त्वचारोगतज्ज्ञांचे मत आहे.

काळजी कशी घ्यावी :

या ऋतूमध्ये त्वचेची योग्य निगा राखणे. त्वचेला निरोगी ठेवणे आणि समस्यांपासून दूर ठेवणे. शरीरातील ओलावा टिकवून ठेवणे आणि त्वचेचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आणि खबरदारी घेणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत. या ऋतूत जास्तीत जास्त पाणी प्यावे. त्यामुळे त्वचा ओलसर राहते. यासोबतच शरीरातून टॉक्सिन्सही बाहेर पडत राहतात. शरीरातील आवश्यक आर्द्रता राखण्यासाठी पाण्याबरोबरच आहारातील द्रवपदार्थांचे प्रमाण आणि फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढावे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असेल.

1.घराबाहेर पडताना चेहरा, हात आणि सूर्याच्या थेट संपर्कात येणाऱ्या शरीराच्या कोणत्याही भागावर स्वच्छ त्वचेवर ३०+ एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे.

2.घरातून बाहेर पडताना तुम्ही सनस्क्रीन नीट लावले असले तरी उन्हात बाहेर पडताना छत्री, टोपी, सनग्लासेस आणि स्कार्फचा थेट संपर्क येऊ नये म्हणून वापरा.

3.दिवसातून किमान दोन ते तीनवेळा आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. जर तुम्ही घराबाहेर असाल तर प्रत्येक वेळी चेहरा धुतल्यानंतर सनस्क्रीन लावा.

4.तीव्र सूर्यप्रकाशात पोहणे टाळा, यामुळे त्वचेला अधिक नुकसान होऊ शकते. या हंगामात पोहण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ योग्य असते. पण यादरम्यान वॉटर प्रूफ सनस्क्रीनचाही वापर करा.

5.आठवड्यातून किमान एकदा त्वचेला एक्सफोलिएट करा आणि दररोज मॉइश्चरायझर वापरा.

6.घराबाहेर पडताना शक्यतो पूर्ण बाही व पूर्ण पायाचे कपडे घाला. केसांसोबत हात पाय सुती कापडाने झाकून ठेवा. कारण प्रखर सूर्यप्रकाशामुळे केसांचे खूप नुकसान होऊ शकते.

योग्य उपचार आवश्यक आहे :

बऱ्याचवेळा जेव्हा त्वचेवर काही समस्या येते किंवा सूर्यप्रकाशामुळे काही नुकसान होते. तेव्हा बरेच लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही औषध वापरतात. खरेतर बाजारात अनेक प्रकारची स्किन क्रीम्स उपलब्ध आहेत, पण सर्वच क्रिम सर्व समस्यांवर प्रभावी ठरत नाहीत. वेगवेगळ्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची क्रीम (औषधे) वापरली जातात. अनेक क्रीममध्ये स्टिरॉइड्स, विशिष्ट अँटीफंगल्स किंवा इतर संयोजनदेखील असतात. अशा परिस्थितीत, सामान्यतः समस्यांनुसार त्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा समस्या सोडवण्यास वेळ तर लागतोच, परंतु काहीवेळा समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत, वैद्यकीय वापरात येणारी कोणतीही क्रीम डॉक्टरांना विचारल्यानंतरच वापरली जाणे फार महत्वाचे आहे.

काही घरगुती उपायदेखील सूर्यप्रकाशाच्या सौम्य प्रभावांमध्ये खूप मदत करतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत :

1.कडक उन्हानंतर सावलीत आल्यानंतर काही मिनिटे थांबा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

2.बर्फाच्या तुकड्यांनी त्वचेला मसाज केल्याने देखील प्रभावित त्वचेला आराम मिळू शकतो. परंतु लक्षात ठेवा की हे सूर्यप्रकाशात आल्यानंतर लगेच करू नका. बुरशीजन्य संसर्गाच्या बाबतीत हा उपाय करू नये.

3.गुलाबपाणी किंवा कोरफडीचे जेल त्वचेवर लावल्यानेही आराम मिळतो.

4.उन्हात जळलेल्या जागेवर थंड दूध कापसाने लावल्याने आराम मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments