आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या तणावाचा शिकार आहे. या तणावावर वेळीच उपाय शोधला नाही तर भविष्यात मानसिक स्थिती आणखी बिघडू शकते, यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया.
माणसाच्या आयुष्यातला एकटेपणा जितका वाढतो, तितका तणाव देखील वाढू लागतो. एखादी गोष्ट स्वत:कडेच ठेवणे आणि त्यावर वारंवार विचार करण्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी इतरांमध्ये मिसळणे, मित्रमैत्रिणींना वेळ देणे किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाणे, अशा गोष्टी केल्या पाहिजे. फिरायला गेल्यावर आपण मित्रमैत्रिणींमध्ये आणि गप्पांमध्ये व्यस्त होतो आणि तणाव येत नाही.
तणाव दूर करण्यासाठी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फिरू शकता. नैसर्गिक वातावरणात फिरल्याने तणाव दूर होतो. निसर्गामुळे नैराश्य, चिंता आणि सर्व प्रकारचा ताण दूर होतो, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे ट्रेकिंग किंवा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत रहा.

तुम्हाला जास्त तणाव जाणवत असेल तर व्यायाम (Exercise) करणे हा सोपा उपाय आहे. नियमित व्यायाम केल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि स्वत:मधला आत्मविश्वास वाढतो. झुंबा, ऐरोबिक्स सारखे व्यायाम केल्याने देखील तणाव दूर होतो.

योगा (Yoga) किंवा ध्यान (Meditation) केल्यामुळे देखील तणाव दूर होतो. योगामुळे नकारात्मक विचार दूर राहतात आणि ताण नाहीसा होतो.

मानसिक तणाव दूर करण्याचा योग्य उपाय म्हणजे अनावश्यक विचारांत वेळ न घालवणे. तुम्ही शक्य तितके व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीचे छंद जोपासा. एखादी कला अंगी बाळगा आणि त्यासाठीच तुमचा पूर्ण वेळ द्या. गायन, शिवणकाम, विणकाम, चित्रकला, यांसारख्या गोष्टींना वेळ द्या.

तुमचा आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टींना स्वत:चा वेळ द्या. आत्मविश्वास वाढला की, मनात नेहमी सकारात्मक विचार येतात आणि संकटाला सामोरं जाणं सोपं जातं. जिम, ड्राइव्हिंग क्लास, डान्स क्लास तुम्ही लावू शकता, त्यामुळे तुमचा तणाव नक्कीच दूर होईल.

तणावमुक्त दिवस घालवण्यासाठी सकाळी मोबाईल वापरू नका. मोबाईलपासून थोडे दूर रहा आणि गरज असली तरच मोबाईल वापरा, यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि चिंतामुक्त रहाल. मोबाईल फोनऐवजी वर्तमानपत्र वाचण्याला प्राधान्य द्या.