म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यामुळे भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभविप) कार्यकर्त्यांनी सोमवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही त्याठिकाणी पोहोचले. त्यामुळे याठिकाणी अभविप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत अभविपच्या आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर या परिसरात अद्याप तणावाचे वातावरण आहे. यावरुन ठाण्यामध्ये आगामी काळात राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
‘अभविप’च्या कार्यकर्त्यांनी सकाळी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी येत आंदोलन सुरु केले. हे आंदोलक आव्हाड यांच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसले होते. यावेळी अभविपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रचंड संतापले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणबाजी सुरु होती. यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांकडून आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप अभविपच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलीस जितेंद्र आव्हाडांच्या इशाऱ्यानुसार काम करत आहेत. म्हाडा पेपरफुटीप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अभिवपच्या कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही अभिवपला चोख प्रत्युत्तर दिले. अभविपच्या कार्यकर्त्यांनी वेळ मागून जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली पाहिजे होती. मात्र, भाजपला या मुद्यावरून फक्त राजकारण करायचे असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केली. भाजपच्या काळातही पेपरफुटीचे प्रकार घडले होते. मात्र, त्याविषयी भाजप बोलत नाही. भाजपने आमचे नेते आणि संघटनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. आम्हीदेखील अभविपच्या कार्यालयात शिरुन असाच गोंधळ घालू, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला.
१२ डिसेंबर रोजी म्हाडाची परीक्षा पार पडणार होती. मात्र, पेपरफुटीच्या संशयामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ही परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली होती. तसेच ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल, असेही आव्हाड यांनी सांगितले होते.