आंबेठाण चौकात मध्यरात्री घडली दुर्घटना; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेठाण चौकात मध्यरात्री ३२ वर्षीय महिलेला भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मृत महिला शोभा वाघमारे या चाकणमधील स्पार्क मिंडा कंपनीत कार्यरत होत्या. सोमवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्या आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखालून जात असताना ६ ते ७ भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी दगड उचलून कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीसमोर त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.
या हल्ल्यात कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, चेहरा आणि मानेवर गंभीर जखमा केल्या. प्रचंड रक्तस्त्राव होऊन अवघ्या १५ मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून नसबंदी आणि लसीकरण मोहीम राबवली जात असल्याचा दावा केला जातो. शहरातील सुमारे ६०० पैकी ४०० कुत्र्यांचे लसीकरण झाल्याची माहिती दिली जात असली, तरी प्रत्यक्षात कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी गंभीर धोका ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर नियंत्रण, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. एका निष्पाप महिलेचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.


