पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री फॉर्च्युनर आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव फॉर्च्युनरने पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत वाकड, पिंपरी-चिंचवड येथील तुषार वामन भुमकर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात फॉर्च्युनरमधील चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार भुमकर हे त्यांच्या फॉर्च्युनर कार क्रमांक एमएच-१४/एमजी-०००७ मधून चार मित्रांसोबत मिसिंग लिंक मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंकच्या बोगद्यात हा अपघात झाला.
भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर फॉर्च्युनरने पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एमएच-०१/सीआर-७०७५ ला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पो मार्गावरच उलटला.
या अपघातात फॉर्च्युनरमधील तुषार भुमकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आयशर टेम्पो चालकासह आणखी एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिसांसह संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मिसिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, वाकड येथील तुषार भुमकर यांच्या अकाली निधनाने पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुषार यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मित्रपरिवार आणि परिचितांकडून शोक व्यक्त केला जात आहे.


