५ एप्रिल २०२१,
छत्तीसगडच्या बीजापूर माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाल्यानं अवघ्या देशावर शोककळा पसरलीय. याच दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्तीसगडला भेट देत आहेत. गृहमंत्री जगदलपूरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील तसंच जखमी जवानांची रुग्णालयात भेट घेणार आहेत.
जगदलपूर विमानतळावर दाखल झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेदेखील विमानतळावर दाखल झाले होते.रविवारी झालेल्या बीजापूर माओवादी हल्ल्यात २२ जवान शहीद झाले तर एक जवान बेपत्ता आहे. ३२ जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात जवानांकडून २५-३० नक्षलवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आल्याचं समजतंय. मात्र, नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.
गृहमंत्री अमित यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार, ते सकाळी १०.४० वाजता जगदपूर विमानतळावर दाखल होतील. पोलीस लाईन जगदलपूरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते बीजापूरकडे रवाना होतील. गृहमंत्री अमित शहा सुरक्षदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेणार आहेत. नक्षल प्रभावित बासागुडा सीआरपीएफ कॅम्पमध्येही ते जातील. तसंच रायपूरमध्ये जखमी जवानांची भेटही ते घेणार आहेत. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता ते दिल्लीकडे रवाना होतील.
अद्याप काही जवान बेपत्ता…
चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्र्ह गार्ड (डीआरजी)च्या आठ, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या सात, स्पेशल टास्क फोर्सच्या सहा आणि ‘सीआरपीएफ’च्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. कोब्रा पथकाचे अनेक जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा जंगलात शोध घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. नक्षलवाद्यांनी नियोजनपूर्वक हा घातपात घडवला, परंतु संरक्षण पथकांचे जवान त्यांच्याशी धैर्याने लढले, असेही त्यांनी सांगितले. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी सापडले होते.