राज्यभरात गुरुवारी सर्वत्र साजरा करण्यात येणाऱ्या होळी सणासाठी गृह विभागाने नियमावली जाहीर केली आहे. यानुसार रात्री १०पूर्वी होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आले आहे. होळीनिमित्त कोणत्याही जाती-धर्मांच्या भावना दुखावतील अशा घोषणा देण्यास मनाई आली असून, तशा स्वरूपाच्या बॅनर आणि पोस्टरवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय सध्या राज्यभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने डीजे आणि मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करून नये, धुलिवंदनाच्या दिवशी जबरदस्ती रंग, पाण्याचे फुगे फेकू नये अशा सूचना नियमावरील करण्यात आल्या आहेत, तर होळीनिमित्त वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईच्या इशारा देण्यात आला आहे. होळी पेटवताना मोठी आग लागणार नाही व वाऱ्याने आग पसरून कोणाच्या घरावर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, होळीच्या आजूबाजूस आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निविरोधक यंत्र आणि पाण्याचा साठा तयार ठेवावा, असेही यात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना ही नियमावली पाठवण्यात आली आहे असून, तिचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
या नियमांचे पालन बंधनकारक
- डीजे किंवा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर नको.
- जाती-धर्माच्या भावना दुखावण्याच्या घोषणा नको
- मद्यपान आणि बीभत्स वर्तन नको
- वृक्षतोड नको, आगीसंबंधी दक्षता घ्या