पुणे – पहिल्या फेरीत दणदणीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या जम्मू-काश्मिर आणि राजस्थान संघांनी आज ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद करत स्पर्धेतील आपले आव्हान राखले. त्याचवेळी ड गटातून दुसऱ्या विजयाची नोंद करून पंजाबने सर्वप्रथण उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मान मिळविला.
नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत आज सी गटात जम्मू-काश्मिर संघाने अरुणाचल प्रदेश संघाचा १०-३ असा परा.भव केला. पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मिरला कर्नाटकाकडून १४ गोलने मात खावी लागली होती. आज त्यांनी संयमाने खेळ करताना स्पर्धेत आव्हान राखले जाईल याची काळजी घेतली. सामन्याच्या १३व्या मिनिटाला जसप्रितने त्यांचे खाते उघडले. त्यानंर त्याने संपूर्ण सामन्यात हॅटट्रिकसह चार गोल केले. पूर्वार्धात उचा सिंग आणि संदीप यांनी एकेक गोल करत अरुणाचल प्रदेशलाही संधी निर्माण करून दिली होती. तरी विश्रांतीला ते याचा फायदा उठवू शकले नाही. त्यांना विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा २-५ असे पिछाडीव रहावे लागले.
बाजू बदलल्यानंतर उत्तरार्धाची सुरवात वेगवान झाली. जम्मू-काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश संघांनी एकाच मिनिटात एकमेकांवर गोल करत चुरस निर्माण केली होती. मात्र, त्यांना नंतर जम्मू काश्मिरच्या आक्रमणांना रोखता आले नाही. त्यानंतर जम्मू-काश्मिर संघाने आणखी चार गोल करत मोठा विजय साकार केला. त्यांच्या जसप्रीतला करणजीत, मनप्रीतने दोन गोल करत साथ केली. संदीप सिंग, हुसेन महंमद दर यांनी एकेक गोल केला.
पहिल्या सामन्यात चंडिगडकडून १४ गोलने मात खाणाऱ्या राजस्थानने आज त्रिपुरावर १८ गोलने विजय मिळविला. विजेंद्र सिंग याने सहा गोल करताना विजयात महत्वाचा वाटा उचलला. शामसिंगने ४, तर हशनप्रीत, करणज्योतनो प्रत्येकी दोन गोल केले. अख्तर कुरेशी, चेतन कालोट आणि अमित कुमार यांनी एकेक गोल नोंदवला.
पंजाबने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आंध्र प्रदेशाचा ७-१ असा पराभव केला. अंदमान-निकोबारच्या माघारीमुळे या गटात तीनच संघ खेळणार असल्याने पंजाबने दुसरा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पंजाब पहिला संघ ठरला.