पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी किवळे येथे लोखंडी होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्क परिसरात असणाऱ्या लक्ष्मी चौक येथे पुन्हा एक मोठे होर्डिंग कोसळले आहे. यात दोन तरुण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अलगतरित्या हे होर्डिंग पडल्याने सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंजवडी परिसरात अनेक अनधिकृत होर्डिंग आहेत. मात्र प्रशासनाकडून कधी कारवाई केली जाते, तर कधी कारवाईला टाळाटाळ केली जाते. अशातच आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यासाठी रस्त्याने येणाऱ्या नागरिकांनी होर्डिंगखाली आश्रय घेतला. दुपारी साधारण तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्क येथील लक्ष्मी चौकात असणाऱ्या रस्त्यावरील एक होर्डिंग वादळी वारे सुरू असल्याने रस्त्यावरच कोसळले. या दुर्घटनेत चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, सदर होर्डिंग कोणी लावले होते, याबाबतची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. हे होर्डिंग पडल्याने किवळे येथील दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या. तसंच या घटनेने अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.