Tuesday, January 13, 2026
Homeगुन्हेगारीएबी फॉर्म प्रकरणी उच्च न्यायालय नाराज; ब क्षेत्रीय कार्यालयातील निर्णय अधिकारी बडतर्फ

एबी फॉर्म प्रकरणी उच्च न्यायालय नाराज; ब क्षेत्रीय कार्यालयातील निर्णय अधिकारी बडतर्फ

महापालिका निवडणूक प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा एबी फॉर्म गायब झाल्याच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे निवडणूक विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चिंचवडमधील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांना तात्काळ सेवेतून काढून टाकले आहे.

रावेत–किवळे–मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ (ओबीसी महिला राखीव) येथून जयश्री मोरेश्वर भोंडवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्यात आला असतानाही छाननीच्या टप्प्यावर तो उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांची उमेदवारी अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आली होती.

या निर्णयाविरोधात भोंडवे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उमेदवारी अर्ज भरताना झालेले सीसीटीव्ही चित्रीकरण, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने प्राथमिक स्तरावर प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नमूद केले आणि प्रकरणाची स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या सूचनेनुसार चिन्ह वाटपाच्या दिवशीच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीची सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म नियमानुसार व वेळेत सादर केल्याचे स्पष्ट झाले. उपलब्ध पुरावे आणि नोंदींच्या तपासणीनंतर एबी फॉर्म वैध ठरवण्यात आला आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ हे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात आले.

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांच्याकडील निवडणूक कामकाज काढून घेत त्यांची तात्काळ बडतर्फी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, एबी फॉर्म नेमका कसा गायब झाला, तो निष्काळजीपणाचा परिणाम होता की जाणीवपूर्वक केलेली कृती, याबाबत शहरभर चर्चेला उधाण आले असून या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments