Friday, June 21, 2024
Homeताजी बातमीदिवाळीतील मिठाईसाठी सरकारने दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश

दिवाळीतील मिठाईसाठी सरकारने दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

१३ नोव्हेंबर २०२०,
दिवाळी सणाच्या दिवसांत जी मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थ तयार करून विकले जातात त्यावर ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्स्पायरी डेट) या दोन्ही तारखा असणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश देत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मिठाई विक्रेत्यांना इशारा दिला आहे व त्याचवेळी ग्राहकांनाही सावध केले आहे

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण बाबींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. जनतेला सकस आणि चांगले खाद्यपदार्थ दिवाळीच्या काळात मिळाले पाहिजे, याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांची दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शासन दक्ष आहे व त्यासाठीच ही पावले उचलली गेली आहेत, असेही राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. संपूर्ण जगावर, देशावर आणि राज्यावर करोना महामारीचे संकट असून अजूनही ते संकट पूर्णपणे टळलेले नाही. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सर्वधर्मियांनी सण अतिशय शांततेने आणि घरातच साजरे केले. त्यानुसार आता दिवाळीसुद्धा प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

नागपुरात भेसळयुक्त मिठाई जप्त

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी उत्तम दर्जाची मिठाई विकण्याचे आवाहन केले असतानाच नागपुरात भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली आहे. नागपूरमधील वाडी पोलिसांनी लाव्ह्यातील कारखान्यावर छापा टाकून ही भेसळयुक्त मिठाई जप्त केली. पोलिसांनी मेघराज मेसूसिंग राजपुरोहित याला ताब्यात घेतले आहे. मेघराज याचा मिठाई निर्मितीचा कारखाना असून तो भेसळयुक्त खवा वापरत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांना मिळाली होती. त्यानुसार नुरूल हसन यांनी या कारखान्यावर छापा टाकण्याचे निर्देश एमआयडीसीचे प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक बागुल यांना दिले. बागुल यांच्या नेतृत्वात वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. बी. सुर्यवंशी, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, हेडकॉन्स्टेबल प्रमोद गिरी, शिपाई संतोष, शिवशंकर, दुर्गादास तसेच अन्न व औषधी विभागाचे सुरक्षा अधिकारी सोयाम, महाजन यांनी कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी भेसळयुक्त मिठाई, खवा यासह पावणे दोन लाखांचे साहित्य जप्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments