Monday, December 4, 2023
Homeआरोग्यविषयकपोटदुखी साठी 'हे' पाच घरगुती उपाय

पोटदुखी साठी ‘हे’ पाच घरगुती उपाय

आपल्या दिवसभराची सगळी धडपड ही मुख्यतः पोटासाठीच चाललेली असते. आपण जे कमावतो, जी धडपड करतो त्या सगळ्याच्या मागचा प्रमुख हेतू हा आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट व्यवस्थित भरले जावे हाच असतो.अगदी आदिमानवापासून आपण इतिहास काढून बघितला तर पोट भरणे ह्या एकाच प्रमुख हेतू वर तेव्हा आपले जीवन केंद्रित होते.

तेव्हा कंदमुळे, झाडाची पाने, कच्चे मांस असल्या गोष्टींनी आपण आपले पोट भरायचो हळूहळू आगीचा शोध लागला, आपण अन्न शिजवून खाऊ लागलो नंतर हळूहळू त्यात अजून सुधारणा होऊन आपण वेगवेगळ्या चवीचे पदार्थ वेगवेगळे मसाले वापरून तयार करू लागले.

जसजशी आपली खाण्याची ही प्रगती होत गेली तसतशी आपल्या पोटाच्या समस्या सुद्धा वाढत गेल्या. आतातर पोटात दुखणे ही अगदी सामान्य समस्या झाली आहे.कधी पोटात दुखत नाही असा माणूस सापडणे तर अशक्य आहे.

आपल्या घरातच अशा अनेक गोष्टी असतात ज्याने आपली पोटदुखी अगदी घरातल्या घरात घालवता येते :

1. लिंबू

लिंबू हा सगळ्यांच्या घरात कायम असणारा घटक आहे. लिंबाचं सरबत, लोणचं न आवडणारा माणूस विरळच. हे लिंबू पोटदुखीवर अगदी जालीम उपाय आहे.

लिंबाचा रस आल्याच्या रसात घालून सकाळी उठल्यावर प्यायला तर पित्ताच्या त्रासाने होणारी पोटदुखी अगदी लगेच थांबते आणि आराम मिळतो. लेमन टी सुद्धा पोटदुखीवर एक चांगला उपाय आहे त्यानेसुद्धा पोटाचे दुखणे थांबण्यास मदत होते.

2. आलं

आलं हा सुद्धा आपल्या स्वयंपाकघरात कायम असणारा घटक आहे. हे आलं सुद्धा लिंबा एवढचं पोटदुखीवरचा रामबाण उपाय आहे.

आल्याचा रस काढून त्याचा हलका मसाज पोटावरून केला तर पोटाचे दुखणे लगेच थांबते. आल्याचा रस जर लिंबाच्या रसासोबत घेतला तर त्याने सुद्धा पोटदुखी थांबते.

3. पुदिना

पुदिना किंवा मिंट हे अनेक पदार्थात वापरले जाते. पुदिन्याची वेगवेगळ्या प्रकारची चटणी सुद्धा लोक आवडीने खातात. ह्या चटणीने जेवणाला एक वेगळीच चव येते.

पुदिन्याची पाने वेगवेगळ्या सरबतात किंवा आईस टी मध्ये सुद्धा वापरली जातात, ह्यामुळ त्या सरबताला एक वेगळीच चव येते. ह्याच पुदिन्याच्या रसाचा उपयोग पोटदुखीवर सुद्धा केला जातो. पुदिन्याच्या औषधी गुणधर्मामुळे पोटदुखीवर बनवल्या जाणाऱ्या अनेक काढ्यामध्ये पुदिन्याचा रस वापरतात.

4. मध

मधमाश्यांच्या प्रचंड मेहनतीचे फळ म्हणजे आपल्याला मिळणारं गोड मध. मधमाशा हजारो फुलांवर फिरून रोज मध गोळा करतात आणि आपल्या पोळ्यात साठवतात.

आपण मात्र त्या पोळ्यावर आयता डल्ला मारून त्यातले मध काढून घेतो. अनेक पदार्थांना त्याची गोड चव हेच मध देते. मधात खूप सारे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.

वजन कमी करणे, चरबी कमी करणे अशा अनेक गोष्टींसाठी मधाचा उपयोग केला जातो. पोटदुखीवर सुद्धा मध फार उपयोगी आहे. लेमन टी मध्ये थोडे मध टाकले तर त्याच्या औषधी गुणधर्म अजून जास्त वाढतो आणि पोटदुखीपासून आपल्याला आराम मिळतो.

5. जिरे

फोडणीच्या डब्यात कायम असणारा पदार्थ म्हणजे जिरे. जीऱ्याची फोडणी दिल्यावर पदार्थाची मूळ चव दुपटीने वाढते.

अनेक पदार्थात चव वाढवण्यासाठी जीऱ्याची पूड वापरली जाते. हे जिरे पोट बिघडण्यावर सुद्धा एक चांगला उपाय आहे. चमचाभर जिरे नुसते चावून खाल्ल्याने किंवा त्याचा रस काढून प्यायल्याने बिघडलेले पोट लगेच चांगले होते.

आपण काय खातो, किती खातो, कसे खातो ह्या सगळ्याचा आपले पोट बिघडण्यात फार महत्वाचा वाटा असतो.त्यामुळे चांगले पौष्टिक खाणे आणि ते सुद्धा वेळेवर खाणे हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. त्याचबरोबर व्यायम सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आपण जे काही खातो ते जर नीट पचले नाही तर पोटदुखी होते. त्यामुळे खाण्याबरोबर त्याच प्रमाणात व्यायाम करणे सुद्धा महत्वाचे आहे. अनेकवेळा नुसत्या चालण्याने सुद्धा पोटदुखी कमी होऊ शकते.

कधीतरी पोट बिघडणे, अपचन होणे ह्या गोष्टींवर घरगुती उपाय करता येतात पण जर आपले पोट रोजच दुखत असेल किंवा खूप जास्त दुखत असेल तर अशा वेळी मात्र आपण ह्या असल्या उपायात वेळ न घालवता लगेच डॉक्टरला भेट द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments