राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठीही आज रेड अलर्ट जारी करून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे घाट परिसरासाठी पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’
हवामान विभागाने पुण्याच्या घाट परिसरासाठी पुढील तीन दिवस रेड अलर्ट दिला असून शहरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवेच्या कमी दाब पट्ट्यामुळे पावसाला पूरक स्थिती निर्माण झाली आहे.
कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे थैमान
कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रत्नागिरीतील नारंगी नदीला पूर आला असून, जगबुडी नदीचे पाणी खेड शहरात शिरले आहे. गड नदीमुळे संगमेश्वरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली असून सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड, चंद्रपूर, नागपूर, जळगाव आणि धाराशीव जिल्ह्यांमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची हवालदिल अवस्था झाली आहे.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टी
बीड, गेवराई, पाटोदा, केज, परळी आणि शिरूर तालुक्यांतील 17 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. खरिपाच्या पिकांना यामुळे जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
137 गावांना सतर्कतेचा इशारा
नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे प्रशासनाने 137 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे तसेच नदीकाठच्या भागातील लोकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


