महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन उशीरा झालं असलं तरी आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या म्हणजेच 29 जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन उशीरा झालं असलं तरी आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या म्हणजेच 29 जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे या भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं होतं. तर ठाण्यातही मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं होतं. रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. कोकणात रत्नागिरीसह चिपळूण आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धबधबे प्रभावित झाले आहेत. गुहागरहून रत्नागिरीला जात असताना रस्त्यालगत असलेला धबधबा येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गणपतीपुळ्यामध्ये सकाळी रस्त्यावर पाणी आलं. सिंधुदुर्गातही पाऊस सुरू असल्यामुळे नदीच्या पातळीमध्येही वाढ झाली आहे, तसंच शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.