शहरात शुक्रवारी सकाळी पडलेल्या दाट धुक्याचा फटका हवाई प्रवासी वाहतुकीला बसला. लोहगाव विमानतळावरून ‘टेक ऑफ’ घेणाऱ्या आणि दाखल होणाऱ्या विमानांना विलंब झाला. पुण्यात येणारी चार विमाने अन्य तळांवर उतरविण्यात आली. तर, पुण्यातून उडणाऱ्या पाच विमानांना एक ते पाच तासांचा विलंब अपेक्षित आहे.
गेल्या दोन दिवसापासून पाऊस तळ ठोकून आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शहरभरात दाट धुके पसरले होते. त्यामुळे लोहगाव विमानतळावरील दृश्यमानता कमी झाली होती. परिणामी, विमानांना टेक ऑफ आणि लँडिंग करताना अडथळे होत होते. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. पहाटे सव्वाचारचे अहमदाबाद पुणे विमान मुंबई विमान तळावर उतरविण्यात आले. तर पहाटे साडेचारचे आणि सकाळी सहाच्या दिली पुणे विमान देखील मुंबईला उतरले. तर, चेन्नई पुणे विमान हैदराबाद विमानतळावर उतरविण्यात आले. याबरोबरच पुण्याहून उडणाऱ्या नागपूर, बेंगलुरू, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई या विमानांना विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.