पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक संतापजनक प्रकार पुण्यातील हडपसर भागात उघडकीस आला आहे. पतीसमोर पत्नीचा विनयभंग केल्याचा समोर आला आहे.
उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना घडल्यानंतर त्या नराधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली.
इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी महिलेच्या पतीस ४० हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये इम्तियाज याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच त्याच्यासमोरच फिर्यादीवर विनयभंग केला होता. त्यानंतर आरोपीने याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली; परंतु तिने नकार दिला असता त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून आणि व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले. या घटनेनंतर आरोपीला अटक केली असून त्याची पुणे पोलिसांनी भरपावसात धिंड काढली.