Wednesday, July 15, 2026
Homeआरोग्यविषयकमुसळधार पावसाचा कहर; पिंपरी-चिंचवड मनपा हायअलर्टवर, ४२०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

मुसळधार पावसाचा कहर; पिंपरी-चिंचवड मनपा हायअलर्टवर, ४२०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची मदत केंद्रांना भेट; ३२६ मिमी पावसाची नोंद, १७-१८ ठिकाणी बोटी तैनात

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी,

शहरात काल दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत ३२६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने सुमारे ४,२०० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.

पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यरत आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील १७ ते १८ संवेदनशील ठिकाणी बचावासाठी बोटी तैनात करण्यात आल्या असून, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पूरग्रस्त नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या मदत केंद्रांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध होत आहेत का, याची माहिती घेतली.

पिंपरी नगर येथील कमला नेहरू शाळेत सर्वात मोठे मदत केंद्र उभारण्यात आले असून, मिलिंदनगर, विजयनगर आणि संजय गांधी नगर परिसरातील २५० कुटुंबांतील १,०८० हून अधिक नागरिकांना येथे सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे. केंद्रामध्ये जनरेटरद्वारे अखंडित वीजपुरवठा, वैद्यकीय सुविधा, पौष्टिक भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छ शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय फुगेवाडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शाळेतील मदत केंद्रात १८५ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असून, तेथील अधिकाऱ्यांना नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.

दरम्यान, हवामान विभागाने उद्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

“नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. नदीपात्राजवळ जाणे टाळावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणतीही आपत्कालीन मदत आवश्यक असल्यास महानगरपालिकेच्या आपत्कालीन हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने महापालिका प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असून, परिस्थितीवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्परतेने राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments