26/11 मुंबई हल्ल्याचा कथित मास्टर माइंड आणि जमाते उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानच्या कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी न्यायालयानं हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गानं पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये 10 वर्षांची ठोठवली. जुलै 2019 मध्ये हाफिजला अटक करण्यात आली होती.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. समुद्राच्या मार्गाने 10 दहशतवादी मुंबईत घुसले होते आणि त्यांनी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी हल्ले केले होते. या हल्ल्या हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळासकर यांच्यासह अनेक पोलीस दहशतवाद्यांकडून ठार झाले होते.
तब्बल 60 तासांहून अधिक काळ दहशतवादी आणि पोलीस यांच्यात चकमक चालली. हेड कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी एका हल्लेखोराला पकडण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. त्या हल्लेखोराचे नाव अजमल कसाब आहे आणि तो पाकिस्तानातून आला आहे अशी माहिती तपासात मिळाली.
या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये असल्याचं कळाल्यानंतर भारताने या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आहे असं म्हटलं होतं. हाफिज सईद याला अटक करावी अशी मागणी लावून धरली होती.