Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून दिली समाजपरिवर्तनाच्या चळवळीला चालना  –अतिरिक्त...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून दिली समाजपरिवर्तनाच्या चळवळीला चालना  –अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री–पुरुष समानता, सामाजिक न्याय व मानवमूल्यांची जपणूक त्यांनी प्रभावीपणे केली. त्यांचे व्यापक कार्य आजही आपल्याला प्रगती, समता व संवेदनशील समाज घडविण्याची दिशा दाखवते. त्यांच्या विचारांचा वारसा जपत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.

भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह नागरिक व महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.

तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तर मोशी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या पुतळ्यास विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी घुले,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,उद्यान विभागाचे बुचडे, मुख्याध्यापिका सुरेखा डांगे, मंगल आल्हाट, पर्यवेक्षिका सुनिता गीते, सुजाता कर्जतकर, उपशिक्षक माया लोखंडे, सरला मोरे, पदवीधर शिक्षक संतोष पन्हाळे, संतोष उपाध्ये, संतोष गवारे, संतोष शितोळे, उपशिक्षिका कांचन घोडे, रुपाली घोडेकर,मोनिका हिंगे, मनीषा नलावडे, फलकलेखक दिपाली कांबळे, सूत्रसंचालक सोमनाथ शिंदे आदी. उपस्थित होते. 

मी सावित्री बोलतीय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिला शिक्षक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘मी सावित्री’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन पिंपरी येथील महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे करण्यात आले होते. समाजसुधारणेच्या इतिहासात क्रांतिकारी ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा हा नाट्यप्रयोग उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला.

या नाट्यप्रयोगामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध संघर्षमय प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले. स्त्री शिक्षणाची संकल्पनाच अमान्य असलेल्या काळात सामाजिक बहिष्कार, अपमान सहन करतही त्यांनी शिक्षणाचा दीप विझू दिला नाही, हे प्रसंग नाट्यरूपातून ठळकपणे उभे करण्यात आले. पहिली मुलींची शाळा सुरू करताना आलेल्या अडचणी, विधवा स्त्रियांसाठी केलेले कार्य अशा प्रसंगांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले.

या कार्यात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा खंबीर पाठिंबा, त्याग आणि दूरदृष्टी अधोरेखित करण्यात आली. समाजप्रबोधनासाठी दोघांनीही एकत्र उभारलेली लढाई, शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानण्याची त्यांची भूमिका आणि त्यासाठी केलेला आयुष्यभराचा संघर्ष नाट्यप्रयोगातून स्पष्टपणे मांडण्यात आला. ‘मी सावित्री’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून आजच्या समाजासाठीही मार्गदर्शक असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.

मोशी महापालिका शाळेत विविध कार्यक्रमांद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महापालिकेच्या मोशी येथील शाळेत देखील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सुधारक कार्याचा जागर करण्यात आला. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी फुले दांपत्याने केलेल्या संघर्षावर शिक्षकांनी मार्गदर्शन केले, तर विद्यार्थ्यांनी भाषणे व सादरीकरणातून त्यांच्या विचारांचा परिचय करून दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments