Monday, July 20, 2026
Homeआरोग्यविषयकपूराच्या विळख्यात गुरुकुलम; मुलांसह २०० हून अधिक गायींची सुखरूप सुटका, अभिषेक बारणे यांची...

पूराच्या विळख्यात गुरुकुलम; मुलांसह २०० हून अधिक गायींची सुखरूप सुटका, अभिषेक बारणे यांची घटनास्थळी धाव

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे थेरगाव आणि चिंचवड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक सखल भागांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी विविध भागांना भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबवल्या.

‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील मुलांची सुरक्षित सुटका

चिंचवडगाव परिसरात पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या **‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’**मधील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अभिषेक बारणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याशी चर्चा करून आणि प्रशासनाच्या यंत्रणेला सोबत घेत गुरुकुलममधील सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

२०० हून अधिक गायींचेही केले सुरक्षित स्थलांतर

गुरुकुलम परिसरातील गोठ्यांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने २०० हून अधिक गायी अडकून पडल्या होत्या. अभिषेक बारणे यांनी बचाव पथकांसह प्रत्यक्ष सहभाग घेत सर्व गायींना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम केले. या बचाव मोहिमेमुळे मोठी जीवितहानी टळली. संकटकाळात मानवी जीवांसह मुक्या जनावरांच्या सुरक्षेलाही समान प्राधान्य देण्यात आल्याने या कार्याचे परिसरातून स्वागत करण्यात आले.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याकडून कौतुक

या बचावकार्यानंतर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी अभिषेक बारणे आणि बचाव पथकाच्या कार्याचे कौतुक केले. संकटकाळात लोकप्रतिनिधीने घटनास्थळी उपस्थित राहून दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता दिलासादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रशासन ‘हाय-अलर्ट’वर

थेरगाव, चिंचवडगाव आणि आसपासच्या परिसरातील पूरस्थिती लक्षात घेता सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना ‘हाय-अलर्ट’वर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अभिषेक बारणे यांनीही प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडत असून महापालिका, अग्निशामक विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments