उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यावर पुर्नविचार करणारी याचिका दाखल करत राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, ही याचिका आज ( ७ जुलै ) गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मोदी आडनावाचे सर्व चोर आहेत’ असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याप्रकरणी भाजपा नेते पूर्वेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत येथील सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या सर्व लोकांची बदनामी केल्याचा आरोप पूर्वेश मोदी यांनी केला होता.
याप्रकरणी सुरत न्यायालयाने २३ मार्च २०२३ ला राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २४ मार्चला लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना अपात्र ठरवलं होतं. सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध राहुल गांधींनी २५ एप्रिलला गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, राहुल गांधींची याचिका सुरत उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.