शहरातील इमारतींच्या बांधकामांद्वारे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक असून निर्देशांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध नियमाधीन कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विविध आदेश आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींचे बांधकाम सुरू असणा-या प्रकल्पांना कमीत कमी ३५ फूट उंच मेटल शीट लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच १ एकर पेक्षा जास्त क्षेत्राच्या भूखंडामध्ये बांधकाम चालू असल्यास भूखंडाच्या भोवती ३५ फूट मेटल शीट व १ एकर पेक्षाकमी क्षेत्राच्या भूखंडासाठी २५ फूट उंच मेटलशीट लावणे बंधनकारक असेल.
बांधकाम सुरू असणाऱ्या सर्व इमारतींना व बाजूने हिरवे कापड अथवा ज्यूट शीट ताडपत्रीने झाकणे बंधनकारक आहे. तसेच पाडकाम सुरू असताना बांधकाम हिरवे कापड, ज्यूट शीट कव्हर, ताडपत्रीने झाकलेली असावीत. बांधकाम पाडताना त्यावर सलग पाणी फवारणे, शिंपडणे आवश्यक असेल. काम सुरू असताना त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य लोडींग अनलोडींग दरम्यान वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी. तसेच सर्व बांधकाम साहित्यावर हवेत उडून जाणारे कण असतात जे वायु प्रदूषणास कारणीभूत ठरतील अशा साहित्यावर आणि मातीच्या साहित्यावर पाणी शिंपडावे जेणेकरून धुलीकण हवेत पसरणार नाहीत.
बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने सर्व बाजूने झाकली जावीत जेणेकरून बांधकाम साहित्य किंवा तत्सम साहित्य वाहतूकी दरम्यान हवेत उडणार नाही तसेच वाहनातून कोणतीही गळती टाळण्यासाठी वाहन ओव्हरलोड केले जाऊ नये याची काळजी घ्यावी. सर्व बांधकाम साईटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत जेणेकरून वाहनांचे टायर साफ केल्यानंतरच चालविले जात आहेत किंवा नाहीत तसेच ओव्हरलोड आहेत किंवा नाहीत याची खात्री करणे शक्य होईल. सर्व बांधकाम साईटवर सेन्सर आधारीत वायुप्रदूषण मॉनिटर लावण्यात यावेत आणि ग्राइंडिंग, कटींग ड्रीलिंग, ट्रीमिंग इत्यादी कामे बंदीस्त भागात केली जातील तसेच काम करताना पाणी फवारणी अथवा वॉटर फॉगिंग करण्यात यावे.
सर्व बांधकाम सुरू असलेल्या कामातील राडारोडा साहित्य महापालिकेच्या मोशी येथील सी ऍन्ड डी वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पामध्ये अनलोडींग करण्यात यावा व त्यानंतर वाहन पूर्णपणे धुवून स्वच्छ करण्यात यावे. तसेच साहित्य वाहून नेणा-या सर्व वाहनांकडे वैध पीयुसी प्रमाणपत्र असणे आवश्यक असून सक्षम अधिका-यांनी त्याबाबत मागणी करताच ते सादर करण्यात यावे.
शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने जारी केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी न केल्यास संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा १९८१ नुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.
वायू प्रदुषणासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना-
·सर्व बांधकाम कर्मचारी/व्यवस्थापक यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वैयक्तिक उपकरणे जसे मास्क, गॉगल्स, हेल्मेट वापरणे आवश्यक
·पूल आणि उड्डाणपूल सुरू असणा-या बांधकामाच्या बाजूने २५ फुटाचे बॅरीकेडींग करणे बंधनकारक
·जमीनीवर सुरू असणाऱ्या सर्व मेट्रोच्या कामांवर २५ फूट उंचीचे बॅरीकेडींग तसेच बांधकामाची जागा हिरवे कापड, ज्यूट शीट, ताडपत्रीने झाकणे बंधनकारक
·जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना स्वायत्त संस्था जसे म्हाडा, एमआयडीसी, पीएमआरडीए, एस आर ए, रेल्वे आदींमार्फत सुरू असणा-या कामांना देखील अनिवार्य
· बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वाहनांवर ट्रॅकींग सिस्टीम बसविली आहे अशाच वाहनांचा वापर करणे आवश्यक
·सैल माती, वाळू, बांधकाम साहित्य हे नेमून दिलेल्या जागेतच टाकले जावे तसेच या जागा योग्यरित्या बॅरीकेट करणे आवश्यक
·मोकळ्या जागेवर, सार्वजनिक रस्ते, फूटपाथ अशा ठिकाणी बांधकाम साहित्य टाकले जाणार नाही याची दक्षता न घेतल्यास दंडात्मक कारवाई
·महापालिका हद्दीत विशेषत: कचरा डेपो आणि कचरा जाळण्याच्या संभाव्य ठिकाणांवर कुठेही कचरा उघड्यावर जाळण्यावर पुर्णपणे बंदी
·बांधकाम सुरू असणाऱ्या सर्व साईटवर वाहनांचे टायर धुण्याची सुविधा असावी तसेच मुख्य रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता केली जाते की नाही याची खात्री करावी