पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या भव्य ‘रमाई सृष्टी’ प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पिंपरीतील भीमसृष्टी परिसरात होणार आहे. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून, अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम तसेच ‘मी रमाई’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे २४९८.९७ चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या सृष्टी प्रकल्पासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, पादचारी मार्ग, लँडस्केप गार्डन, कारंजी, आधुनिक रोषणाई यांसह रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी सुबक चौथरा उभारण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी रॅम्प व लिफ्टची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तसेच या सृष्टीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड व बहुभाषिक ऑडिओ प्रणालीद्वारे माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “माता रमाई आंबेडकर यांच्या त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरेल. सामाजिक समतेचा संदेश देणारे हे स्मारक शहराच्या सांस्कृतिक ओळखीत मोलाची भर घालेल.”
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


