पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘पवनाथडी’ जत्रा २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदान, सांगवी येथे होणाऱ्या या जत्रेचे उद्घाटन २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित या उपक्रमात नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांसह विविध उपयुक्त वस्तूंचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले असून, या माध्यमातून महिला उद्योजकतेला चालना मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशही या उपक्रमामागे आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच नगरसदस्य, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.
⸻
पवनाथडी जत्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम
(सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरू होणार)
• २५ फेब्रुवारी – ‘महाराष्ट्राची मराठी बाणा’
• २६ फेब्रुवारी – सुप्रसिद्ध ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम
• २७ फेब्रुवारी – ऑर्केस्ट्रा म्युझिकल स्टार्स
• २८ फेब्रुवारी – ‘फोक संस्कृती’
• १ मार्च – ‘द फोक लावणी’
ही जत्रा महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देतानाच नागरिकांसाठी खरेदी, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनोखा संगम ठरणार आहे.


