Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या नेत्यांचा शब्द 'प्रमाण'; मावळात चालवणार फक्त 'धनुष्यबाण'!

महायुतीच्या नेत्यांचा शब्द ‘प्रमाण’; मावळात चालवणार फक्त ‘धनुष्यबाण’!

मावळच्या विकासासाठी एकत्र राहण्याचा महायुतीच्या मेळाव्यात संकल्प

महायुतीच्या नेत्यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. त्यांच्या आदेशानुसार एकजुटीने व एकदिलाने फक्त ‘धनुष्यबाण’ चिन्ह चालविण्यात येईल, असा निर्वाळा मावळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी काल (मंगळवारी) दिला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत जवळ हिरकणी लॉन्स येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा झाला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या मेळाव्यात एकमेकांवर मिश्किल शेरेबाजी करत महायुतीच्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी खासदार बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

मेळाव्यास खासदार बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजप विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भालेकर, भाजपा महिला आघाडीच्या तालुक्याध्यक्ष सायली बोत्रे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, शिवसेना महिला संघटक शैला पाचपुते, तसेच सचिन घोटकुले, गुलाबराव म्हाळसकर, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, बाळासाहेब घोटकुले, ज्ञानेश्वर दळवी, बाबुराव वायकर, शरद हुलावळे, राजेंद्र तरस, सुनील मोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीत एकमत – बाळा भेगडे
बाळा भेगडे म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणे, यात काहीही गैर नव्हते.‌ पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी सांगितल्यानंतर तो विषय आता संपलेला आहे. देशाचा इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे. त्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढणारे देखील आम्ही आता एका व्यासपीठावर आलो आहोत.

महायुतीच्या नेत्यांप्रमाणेच आता कार्यकर्त्यांमध्येही एकमत होऊन खासदार बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर ही कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार सुनील शेळके यांची टोलेबाजी

आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करत सभा गाजवली. गेल्या पाच वर्षात जेवढी राजकीय स्थित्यंतरे अनुभवली तेवढी इतरांनी 50 वर्षांत अनुभवली नसतील, असे सांगत ते म्हणाले की, अनेक नाट्यपूर्ण राजकीय उलथापालथी झाल्याने कधी विरोधात, कधी सत्तेत, कधी बरोबर, कधी बाजूला अशा वेळोवेळी भूमिका बदलाव्या लागल्या. हे सर्व करीत असताना मावळचा विकास या एकाच मुद्द्यासाठी आम्ही तडजोडी केल्या. मानापमान सहन केला. तालुक्याला न्याय देईल, विकास करेल त्यालाच पाठिंबा, एवढीच आपली भूमिका असते.

तालुक्याला दोन-अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देणाऱ्या नेत्याशी इमान राखणे आवश्यक आहे. अजितदादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे मावळात बारणे यांना आपल्यापेक्षाही अधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली. बारणे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावा एवढीच माझी मागणी होती, त्याप्रमाणे त्यांनी तो दिला आहे. त्यामुळे आता कोणतीही तक्रार उरलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गांवरील उड्डाणपूल लवकरच – बारणे

मावळ तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांबाबत खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात उहापोह केला. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर मावळ तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्तावही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील काही प्रलंबित कामे अंतिम टप्प्यात असून निवडणुकीनंतर त्यांना गती मिळेल, असेही बारणे यांनी स्पष्ट केले.

आपले मत वाया घालवू नका – बापूसाहेब भेगडे

महायुतीच्या नेत्यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी नेत्यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. यावेळी आयुष्यात प्रथमच मी धनुष्यबाणाला मतदान करणार आहे, असे बापूसाहेब भेगडे यांनी सांगितले. आपले मत वाया घालू नका, विरोधात काम करून पायावर धोंडा पाडून घेऊ नका, असेही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बजावले.

खासदार बारणे यांच्या रूपात आम्हाला साक्षात नरेंद्र मोदीच दिसत आहेत, असे उद्गार भास्करराव म्हाळसकर यांनी काढले. गतिमान विकासासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे ही भारताची गरज आहे, असे रवींद्र भेगडे म्हणाले. खासदार बारणे यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल, असे गणेश खांडगे यांनी सांगितले. विरोधकांची खुर्ची धोक्यात असल्यामुळेच, संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार ते करीत आहेत, असा आरोप सूर्यकांत वाघमारे यांनी केला. सचिन घोटकुले यांनी स्वागत केले तर राजू खांडभोर यांनी आभार मानले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments