ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रातही या नवीन विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासन प्रयत्न करत आहे. दुसरीकडे हा धोका वाढत असतानाच, एक दिलासा देणारी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात बुधवारी ८९३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात १० रुग्णांचा मृत्यू ओढवला. दिलासादायक बाब म्हणजे, ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र, काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या हद्दीत बुधवारी २६० नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात एक करोना रुग्ण दगावला. सध्या राज्यात ७४ हजार १७० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर ८९१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील दहा मृतांमध्ये पुणे जिल्ह्यातील तीन, बीडमधील दोन, मुंबई, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूचा समावेश आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात बुधवारी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. दिवसभरात नवीन १२१ करोना रुग्ण आढळले. यापैकी ठाणे शहरात ३७, कल्याण-डोंबिवली २२, नवी मुंबईत ३६, भिवंडी २, मिरा-भाईंदर १७, अंबरनाथ २, बदलापूर २, ठाणे ग्रामीणमध्ये ३ रुग्ण आढळले. उल्हासनगरमध्ये एकही रुग्ण आढळला नाही.