Tuesday, February 27, 2024
Homeआरोग्यविषयकगुड न्युज ; पिंपरी-चिंचवड शहर विकासकामांत राज्यात आघाडीवर

गुड न्युज ; पिंपरी-चिंचवड शहर विकासकामांत राज्यात आघाडीवर

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकासकामांमध्ये राज्यात पिंपरी-चिंचवडपाठोपाठ पुणे, सोलापूर ही शहरे आघाडीवर आहेत. ही तिन्ही शहरे जुलै २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करतील, अशी अपेक्षा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर तथा सहसचिव कुणालकुमार यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी योजना आखण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश झाल्यानंतर शहरात चालू असलेल्या ‘एबीडी’ व ‘पॅन सिटी’ प्रकल्पांची पाहणी कुणालकुमार यांनी केली. त्यानंतर ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड व पुणे स्मार्ट सिटीच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण, महाव्यवस्थापक अशोक भालकर, मुख्य वित्तीय अध‍िकारी सुनील भोसले, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, सहायक मुख्य कार्यकारी अध‍िकारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह पुणे स्मार्ट सिटीचे अध‍िकारी व सल्लागार प्रतिनिधी उपस्थ‍ित होते.

‘स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रकल्प हाती घेतलेल्या विकासकामांमध्ये राज्यात पिंपरी-चिंचवडपाठोपाठ पुणे, सोलापूर शहरे आघाडीवर आहेत,’ असे नमूद करून कुणालकुमार म्हणाले, ‘विकासकामांचा वेग लक्षात घेऊन नागरिकांसाठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प उपयुक्त ठरतील, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. व्हॉटसअॅप, फेसबुक; तसेच प्रिंट मीडियाच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पांविषयी जास्तीत जास्त माहिती व्हायला हवी.’ बैठकीमध्ये कुणालकुमार यांनी पालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. उपलब्ध निधी, त्याचा विनियोग, प्रगतिपथावरील कामे, पूर्ण झालेली कामे याविषयी सविस्तर चर्चा केली.

पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राजमाता जिजाऊ उद्यान व पार्किंग व्यवस्था, रस्ते, फूटपाथ या कामांची पाहणी केली. ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त सुदर्शन चौकात ७५ तासांमध्ये ‘एट टू एटी’ पार्कची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर प्रजासत्ताकदिनी उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्या ठिकाणी जाऊन ज्येष्ठ नागरिकांसाठीची ओपन जिम, बैठकव्यवस्था याविषयी पाहणी केली. शहरामध्ये अर्बन स्ट्रीटअंतर्गत तयार करण्यात आलेले रस्ते व सायकल ट्रॅकची पाहणी केली. विकासकामांच्या संदर्भात नागरिकांसमवेत प्रत्यक्ष संवाद साधून प्रकल्पांबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

उद्यान विकसित होण्यापूर्वी ही जागा रिकामी होती. लोक या ठिकाणी कचरा टाकत होते, अशी माहिती मिळाल्यानंतर ‘या जागेवर उद्यान का करावेसे वाटले,’ असा प्रश्न कुणालकुमार यांनी विचारला. त्यावर ‘येथील नागरिकांची गरज लक्षात घेतली. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन वारकरी संप्रदायातील नागरिकांनी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे उद्यान विकसित केले,’ असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. यावर कुणालकुमार यांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments