२३ ऑक्टोबर २०२०,
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोल्डमॅन सनीसह त्याच्या कुटुंबातील इतर चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सनी नाना वाघचौरे (३१) आशा नाना वाघचौरे (५६), नाना वाघचौरे (६०), नीता गायकवाड (३६) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
सनी वाघचौरे हा कॉमेडियन कपिल शर्माचा मित्र असून त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्जज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमॅन सनी वाघचौरेसह त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी पत्नीला मारहाण करून, शिवीगाळ करत गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या आई-वडिलांकडे गृहउपोयोगी वस्तूची मागणी वाघचौरे याने केली होती. दरम्यान, बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊन फिर्यादीस मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिली आणि गर्भपाताचे औषध देऊन गर्भपात केला, असं फिर्यादीत पीडित पत्नीने म्हटले आहे. पती सनी, सासरे, सासू आणि नणंद यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचं पोलीस तक्रारीत फिर्यादीने म्हटलं आहे. या घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.