Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीसमाज आणि देश हितासाठी जेलमध्ये जाणे हा आमचा अलंकार - अण्णा हजारे

समाज आणि देश हितासाठी जेलमध्ये जाणे हा आमचा अलंकार – अण्णा हजारे

२३ सप्टेंबर २०२१,
‘समाज आणि देश हितासाठी जेलमध्ये जाणे हा आमचा अलंकार आहे. चारवेळेला जेलमध्ये गेलो, पण ज्या ज्या वेळेला मला जेलमध्ये टाकले ते ते सरकार पडले. त्यामुळे सत्य कधी सोडू नये, ते कधीच पराजीत होत नाही. तसेच, ‘देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे जे लढले त्यांना कधीही विसरू नका,’ असे विचार पद्मभूषण अण्णा हजारे यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘श्यामची आई सन्मान’ सोहळा आज (दि. 23) राळेगणसिद्धी येथे संपन्न झाला. यावेळी टाटा मोटर्सचे विरिष्ठ निवृत्त अधिकारी मनोहर पारळकर आणि त्यांच्या आई सुशिला पारळकर यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘श्यामची आई’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अण्णा हजारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते.

यावेळी नारायण सुर्वे, साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे दिनेश आवटी, निवड समितीचे प्रमुख कवी उद्धव कानडे, जेष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अण्णा हजारे पुढे म्हणाले, ‘शब्दाला कृतीची जोड दिली पाहिजे त्यासाठी आपले आचार विचार शुद्ध असले पाहिजेत. जीवन निष्कलंक असावे. त्याग जीवनात फार महत्वाचा असतो तसेच शिक्षणातून माणूस घडत गेला पाहिजे’ असे विचार अण्णा हजारे यांनी मांडले. ‘सत्य की नाव हिलती है, डुलती है लेकीन, डूबती कभी नही’ त्यामुळे सत्य कधी सोडायचं नाही. तसेच, कथनी पेक्षा करणीवर भर देऊन उत्तम काम करत रहावे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कामाला माझ्या शुभेच्छा.’ असे अण्णा हजारे म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, ‘शिक्षणाने विद्यार्थी सुसंस्कृत बनतो का पॅकेज मिळवणारा कामागार बनतो हे महत्वाचे आहे. आजच्या ऑनलाईन शिक्षणाची परिस्थिती वेगळी आहे. शिक्षक, फळा आणि विद्यार्थी यांचा समन्वय झाल्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही. निसर्ग आणि माणूस ज्या शिक्षणाने आणि संस्कारांनी जोडलेला होता तो संस्कार आज संपलेला आहे. म्हणून गटारी अमावस्या आज सर्वात मोठा सण आहे. येत्या काळात निरोगी आणि निर्व्यसनी मुलं ज्याच्या घरात असतील तो सर्वांत श्रीमंत व्यक्ती असेल.’

‘तापमान बदलाचे गंभीर परिणाम येत्या काळात आपल्या सोसावे लागणार आहेत. दुर्दैवाने याबाबत शिक्षण द्यायला कोणी तयार नाही. पॅकेज मिळणा-या शिक्षणाकडे ओढा वाढला आणि पर्यावरण विषय दुर्लक्षित राहिला आहे.’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

पुरस्काराला उत्तर देताना मनोहर पारळकर म्हणाले, ‘मोठ्यांचे कौतुक कुणीही करते पण, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सामान्य माणूसच ख-या अर्थान असामान्य असतो, साहेबी पोशाख घातलेली आमच्या सारखी माणसं फारशी कामाची नसतात. ‘वयाच्या सहाव्या वर्षी मी घरापासून आठशे किलोमीटर दुर जाऊन राहिलो, शाळेत असताना जवळ कुणी नसताना आम्ही कुठल्याही वाईट मार्गाला लागलो नाही हे आईच्या करारीपणामुळे शक्य झाले. आजचा पुरस्काराचे श्रेय आईच्या त्याग आणि संस्काराला जाते. त्यागातून संस्कार होतात, मग तो त्याग वेळेचा असेल, पैशांचा असेल किंवा आणखी कशाचाही असू शकतो.’ असे पारळकर यांनी नमूद केले

प्रकृती बरी नसल्याने पुरस्काराला हजर राहु न शकलेल्या सुशिला पारळकर यांनी पुरस्काराला उत्तर म्हणून लिहलेले पत्र मनोहर पारळकर यांनी यावेळी वाचून दाखविले. ‘आण्णाना सप्रेम नमस्कार, मला असा पुरस्कार मिळेल हा विचार स्वप्नात देखील आला नव्हता. मी खेड्यातील शेती करणारी बाई. मुलाला शिक्षणासाठी नागपूरला पाठवले त्यानंतर मुंबईला. मनोहरला टाटा मोटर्समध्ये नोकरी लागली आणि 35 वर्ष सर्व जबाबदा-या यशस्वीरित्या पार पाडल्या याचे समाधान आहे.’

या सोहळ्यात भोसरीतील श्रीराम प्राथमिक विद्यामंदिर’चे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे यांचा साने ‘गुरुजी विचार साधना’ पुरस्कार देऊन गौरव केला. याशिवाय जगन्नाथ शिवले, सुबोध गलांडे आणि श्रीकांत चौगुले यांचा ‘साने गुरुजी शिक्षकप्रतिभा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तिन्ही शिक्षकांची यावेळी मुलाखत घेण्यात आली. सुनिताराजे पवार यांच्या ‘कांडा’ या कांदबरीला ‘सानेगुरुजी बालसाहित्य’ पुरस्कार देण्यात आला. सुनिताराजे पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

कवी राजेंद्र वाघ यांनी ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना यावेळी सादर केली. तसेच, पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार प्राप्त बाजीराव सातपुते यांनी ‘आई’ ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले यांनी तर प्रा. दिगबंर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अनिल कातळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments