Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीसमाजासाठी सत्कार्य करणारे देवासमान! - ह. भ. प. किसनमहाराज चौधरी

समाजासाठी सत्कार्य करणारे देवासमान! – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी

साईदीप प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा संपन्न

‘समाजासाठी सत्कार्य करणारे देवासमान असतात. यशवंतराव चव्हाण यांचे सत्कार्य आणि घराघरांतील महिलांचे कार्य वंदनीय आहे!’ असे गौरवोद्गार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी संत तुकाराम उद्यान, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी काढले. जागतिक महिलादिन आणि यशवंतराव चव्हाण जयंतीचे औचित्य साधून साईदीप प्रतिष्ठान – पुणे आयोजित यशवंत – वेणू आणि यशवंतराव चव्हाण उद्योजकता पुरस्कार तसेच महिला सन्मान सोहळ्यात किसनमहाराज चौधरी बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, कृष्णा मित्तल, ज्ञानेश्वर काळोखे, प्राचार्य भानुदास मालुसरे आणि साईदीप प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष प्रा. सुदाम औचरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने डाॅ. दिलीपसिंह मोहिते आणि मीनांजली मोहिते या दांपत्याला यशवंत – वेणू पुरस्कार तसेच वसंत उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा प्रेमचंद मित्तल यांना यशवंतराव चव्हाण उद्योजकता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच संस्कार वर्धिनी महिला प्रतिष्ठान, प्रेरणा महिला महासंघ, विठ्ठल – रुक्मिणी भजनी मंडळ या संस्थांच्या वतीने समाजाच्या विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या महिलांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये मीरा कुदळे, लीला दळवी, अनिता दळवी, रुक्मिणी भूषणवार, शकुंतला साळुंखे, सरिता तराळ, जयश्री बेरे, कांचन शिंदे, कमल मरडे, ललिता माने, रश्मी बांदेकर, संध्या खैरनार यांचा समावेश होता. 

दीपप्रज्वलन, वृक्षपूजन आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. साक्षी औटी यांनी गणेशवंदना सादर केली. प्रा. सुदाम औचरे यांनी प्रास्ताविकातून, ‘साईदीप प्रतिष्ठान पिंपरी – चिंचवड शहरात सुमारे चाळीस वर्षांपासून कार्यरत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मोहिते दांपत्याच्या सामाजिक कार्याचा तसेच प्रेमचंद मित्तल यांच्या औद्योगिक योगदानाचा गौरव करण्याची संधी प्रतिष्ठानला मिळाली!’ अशी पुरस्कार प्रदान करण्यामागील भूमिका मांडली. सुप्रिया सोळांकुरे यांनी, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला सामाजिक कार्य करण्याची संधी लाभली. यशवंतराव यांच्या नावाचा पुरस्कार म्हणजे समाजाप्रति समर्पण आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे!’ असे विचार व्यक्त केले. शैलजा मोरे आणि शर्मिला बाबर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. दिलीपसिंह मोहिते यांनी पुरस्कारार्थींच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. नम्रता उनवणे, संजीवनी शिंदे, संगीता गरुड यांनी संयोजन केले. शुभम खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती बालटे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments