महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. बारावीत यंदा ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सालाबादप्रमाणे मुलींनीच यंदाही बाजी मारली. १०० टक्के गुण मिळवत छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थिनी तनिशा सागर बोरामणीकर ही राज्यात अव्वल आली.
महाराष्ट्रातील मुली हुश्शार
बारावीच्या निकालात यावर्षी सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४ % लागला, तर मुलांचा निकाल ९१.६० % लागला. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४% ने जास्त आहे.
पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळवत तनिशा सागर बोरामणीकर ही विद्यार्थिनी राज्यात पहिली आली. ती छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजमध्ये शिकते.
बारावीत यावेळी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९३.३७ इतकी आहे. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० % आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५%) आहे.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे : ९३.४४ टक्के
नागपूर : ९२.१२ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९४.०८ टक्के
मुंबई : ९१.९५ टक्के
कोल्हापूर : ९४.२४ टक्के
अमरावती : ९३.०० टक्के
नाशिक : ९४.७१ टक्के
लातूर : ९२.३६ टक्के
कोकण : ९७.५१ टक्के