पिंपरी चिंचवड साहित्य सृष्टीतील ज्येष्ठ गझलकार व गझलपुष्प चे पहिले अध्यक्ष कै. रघुनाथ पाटील यांचे गेल्या महिन्यात अकस्मात निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मराठी गझल मुशायरा व कवी संमेलन पैस रंगमंच चिंचवड येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गझल सम्राट सुरेश भट व ज्येष्ठ गझलकार कै रघुनाथ पाटील यांच्या प्रतिमेस कै. रघुनाथ पाटील यांच्या पत्नी, मुलगा व सून तसेच गझलपुष्प चे विद्यमान अध्यक्ष संदीप जाधव, ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार मुरडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकामध्ये गझलपुष्प चे संस्थापक व सचिव दिनेश भोसले यांनी गझलपुष्प संस्थेच्या स्थापनेचे बीज कसे पेरण्यात आले हे सांगितले व रघुनाथ पाटील यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. तद्नंतर शमा प्रज्वलन करून गझल मुशायऱ्यास प्रारंभ करण्यात आला. एक से बढकर एक गझलांच्या बहारदार सादरीकरणाने मुशायरा रंगतदार झाला. यामध्ये रविंद्र सोनवणे (नवी मुंबई), व्यंकटेश कुलकर्णी (हैदराबाद), सुप्रिया हळबे (ठाणे), मनिषा नाईक (पुणे), मारोती वाघमारे (आळंदी), प्रशांत पोरे, अभिजीत काळे, निलेश शेंबेकर सहभागी झाले होते. मुशायऱ्याचे निवेदन दिनेश भोसले यांनी केले. २३ सप्टेंबर हा रघुनाथ पाटील यांचा जन्मदिवस. इथून पुढे दरवर्षी २३ सप्टेंबर च्या जवळच्या रविवारी कै. रघुनाथ पाटील स्मृती मुशायरा व कवी संमेलन चे आयोजन करण्यात येईल असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले तसेच संवेदना प्रकाशन चे प्रकाशक नितीन हिरवे यांनी लवकरच कै. रघुनाथ पाटील यांचा हझल संग्रह प्रकाशित करणार असल्याचे घोषित केले.
यानंतर अतिशय सुंदर अशा कवी संमेलनास प्रारंभ झाला. कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे होते. यामध्ये सविता इंगळे, दत्तू ठोकळे, शोभा जोशी, कैलास बहिरट, वर्षा बालगोपाल, जयश्री श्रीखंडे, जयवंत पवार सहभागी झाले होते. अतिशय सुंदर, वास्तववादी व हसमुख अशा विविध प्रकारच्या कवितांचे सादरीकरण यावेळी कवींमार्फत करण्यात आले. अध्यक्ष नंदकुमार मुरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये कविता पाठ असायला हवी व कवितेचे सादरीकरण प्रभावी कसे असायला हवे याबाबत सोदाहरण सांगितले. कवी संमेलनाचे निवेदन व कार्यक्रमाचे आभार सुहास घुमरे यांनी मानले.
मुशायऱ्यातील सहभागी गझलकारांना कै रघुनाथ पाटील यांचा काव्यसंग्रह व कवी संमेलनातील सहभागी कवींना कै रघुनाथ पाटील यांचा गझलसंग्रह भेट देण्यात आला. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी संस्था अध्यक्ष संदीप जाधव, संजय खोत, गणेश भुते, रेखा कुलकर्णी, मीना शिंदे, अविनाश घोंगटे यांनी अथक परिश्रम घेतले.