भारतातील अब्जाधीश आणि अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी कंपनीचा महत्त्वाकांक्षी FPO बाजारातून गुंडाळण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ज्यांनी या एफपीओची खरेदी केली, त्या गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आहे. एफपीओ खरेदीचे सर्व पैसे गुंतवणूकारांना परत करणार असल्याचं अदाणी समूहाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, नेमकं अदाणींनी असं का केलं? यावर शेअर बाजारात चर्चा सुरू असताना अदाणींनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यासंदर्भातील अदाणींच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला आहे.
अदाणी समूहाच्या हवाल्याने हा व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतम अदाणी स्वत: या निर्णयाविषयी माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीमध्ये अदाणींनी हा निर्णय का घेतला, कुणी घेतला आणि या निर्णयानंतर पुढे अदाणी समूहाची वाटचाल कशी असणार आहे? याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.
अदाणींनी बुधवारी अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हा निर्णय कंपनीच्या बोर्डाने घेतल्याचं सांगितलं आहे. “मित्रहो, आमचे एफपीओ पूर्णपणे विक्री झाल्यानंतर काल आम्ही ते एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण काल शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिरता पाहाता आमच्या बोर्डाला असं वाटलं की या एफपीओचे व्यवहार अशाच प्रकारे सुरू ठेवणं नैतिकतेला धरून राहणार नाही”, असं अदाणी या व्हिडीओमध्ये म्हणाले.