चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीसह तिघांना अटक; ५.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त तिघांना अटक, ५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने वीज वितरण कंपनीच्या डीपी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत डीपी चोरीसह संबंधित गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे ५ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ग्रामीण भागातील दिघी, आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वीज वितरण कंपनीच्या डीपी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळावरील माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना आरोपींबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून डीपी चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित माहिती मिळाल्यानंतर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणात उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. आरोपींची नावे आणि वय पुढीलप्रमाणे आहेत :
गौतम जैस्वार (वय ३४ वर्षे)
विनोद हरिराम जैस्वार (वय ४० वर्षे)
मनिष महेंद्र प्रसाद (वय ३८ वर्षे)
पोलिसांनी या कारवाईत डीपीमधील तांब्याच्या तारा, तांब्याचे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ९१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या कारवाईत आळंदी पोलीस ठाण्यातील पाच आणि संबंधित गुन्ह्यांसह एकूण सहा गुन्ह्यांची उकल झाल्याचा उल्लेख प्रसिद्धिपत्रकात आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि भारतीय विद्युत कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्रीरंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड व गुन्हे शाखा युनिट ३ वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला


