वाकड परिसरातील स्टार बाजार तसेच इतर ठिकाणी खाद्यपदार्थ व सुका मेवा चोरी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांच्या तपास पथकाने छडा लावला आहे. या कारवाईत एकूण सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी वाकड येथील स्टार बाजारमध्ये काही महिला व पुरुष ऑटो रिक्षातून आले. त्यांनी तूप, बदाम, काजू पॅकेट्स तसेच इतर खाद्यवस्तू चोरी केल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार पोलिसांच्या हाती लागली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिस तपासात या आरोपींचा संबंध पिंपरी, चिंचवड, चिखली, पिंपळे, केसनंद फाटा, वाघोली आदी परिसरातील स्टार बाजारमधील चोरीच्या घटनांशी असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून चोरीचा माल तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.


