Wednesday, May 20, 2026
Homeताजी बातमीगणेश मूर्ती संकलन मोहिमेत दोन दिवसांत चार हजारांवर मूर्तींचे संकलन..

गणेश मूर्ती संकलन मोहिमेत दोन दिवसांत चार हजारांवर मूर्तींचे संकलन..

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत २९ ऑगस्ट २०२५ दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील ८ प्रभागांतून तब्बल ४ हजार ०३२ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरणपूरक मूर्ती ८२२ तर पीओपीच्या ३ हजार २१० मूर्तींचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची नोंद ठेवताना ती पीओपीची आहे की शाडू मातीची आहे, याप्रमाणे नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज संकलित होणाऱ्या मूर्तींची नोंद केली जात आहे. महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत मूर्ती संकलन मोहिमेचे निरीक्षण नियमितपणे केले जात आहे. तसेच मूर्तींचे संकलन झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारी देखील पार पाडली जात आहे. 

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अमित पंडित, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे.  

दरम्यान, महापालिकेच्या मूर्ती संकलन उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ पासून ते २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर चार हजारांपेक्षा जास्त मूर्तींचे संकलन झाले आहे. तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करताना महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभागनिहाय मूर्ती संकलन

(आकडेवारी २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची)

• अ प्रभाग – १४

• ब प्रभाग – ६२५

• क प्रभाग – ८७४

• ड प्रभाग – ८८०

• ई प्रभाग – ३३४

• फ प्रभाग – २२७

• ग प्रभाग – ७१४

• ह प्रभाग – ३६४

‘पुनरावर्तन’ मोहीमेला मिळतोय प्रतिसाद 

पिंपरी चिंचवड महापालिका यंदा गणेशोत्सव काळात इको एक्झिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने ‘पुर्नावर्तन’ मोहीम राबवत आहे. या मोहिमेंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर ती माती पुन्हा संकलित करून मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर मूर्तिकार ती माती पुन्हा मूर्तीसाठी वापरू शकणार आहेत. या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. इको एक्झिस्ट फाउंडेशनच्या शामा देव, मैत्रेय घोरपडे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक यांचे सहकार्य या उपक्रमासाठी मिळत आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्ती संकलन उपक्रमामध्ये नागरिकांचा वाढता सहभाग हे या उपक्रमाचे यश आहे. या संकलन मोहिमेमुळे नदी-नाल्यांचे प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होईल.-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मूर्ती संकलन उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे नागरिकांची पर्यावरणाबाबतची जाण वाढत असल्याचे लक्षण आहे. नागरिकांनी पुढील काही दिवसांतही याच पद्धतीने सहकार्य करून ‘स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर  दोन दिवसांत चार हजारांपेक्षा जास्त मूर्ती संकलित झाल्या असून सर्व मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जाईल. नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड घडविण्यास हातभार लावावा. संजय कुलकर्णी, – मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments