सिनेमागृहांमध्ये ‘गदर २’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळत आहे. सनी देओल व अमीषा पटेलचा हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाल्यापासून तुफान कमाई करत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवसात ‘गदर २’ ने जवळपास ८३ कोटींचा व्यवसाय केला होता. त्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘गदर २’ ने रविवारी तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. ‘गदर २’ चे शो हाऊसफुल्ल होत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ४०.१ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी ४३.०८ कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांपेक्षाही जास्त कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी गदर २ ने ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने १३३.१८ कोटींची कमाई केली आहे.
‘गदर २’ ने ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडला
‘गदर २’ च्या कमाईची तुलना ‘बाहुबली’शी केल्यास सनी देओलचा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. ‘बाहुबली २’ ने तीन दिवसांत हिंदीत केवळ ७४.४ कोटींची कमाई केली होती, तर ‘बाहुबली: द बिगिनिंग’ने तीन दिवसांत केवळ २२.३५ कोटींची कमाई केली होती. त्या तुलनेत गदर २ ची कमाई खूपच जास्त आहे.
सनी देओलचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ने पहिल्या दिवशी १.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.२७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १.६० कोटींची कमाई केली होती. २२ वर्षांपूर्वी या चित्रपटाने एकूण ७६.६५ कोटींचा गल्ला जमवला होता.